पुणे : राज्यात गेल्या आठवड्याभरापासून सुरु असलेला पावसाचा जोर आता ओसरण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. सोमवारपासून गुरुवारपर्यंत राज्यात कुठेही रेड किंवा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आले नाही,
कोकणात तर महिनाभरापासून सतत पाऊस पडत आहे. त्यामुळे अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. कोकण व विदर्भातील जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. या ठिकाणी तुरळक ठिकाणी पाऊस होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
31 जुलैपर्यंत मराठवाडा, नाशिक, अहमदनगर, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पुणे येथे मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याभागात 1 ऑगस्टपासून जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला आहे. त्यामुळे पंचगंगा नदीची पाणी पातळी कमी होत आहे. गेल्या 24 तासात 1 फूट 2 इंचाने पंचगंगा नदीची पाणी पातळी कमी झाली आहे. पण दुसरीकडे कृष्णा नदीची पाणी पातळी वाढली असल्याने शिरोळ तालुक्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील पंचगंगा, वारणा, दूधगंगा या प्रमुख नद्यांसह इतर नद्यांचे पाणी कृष्णा नदीला जाऊन मिळतात, त्यामुळे कृष्णेची पाणी पातळीत वाढ होऊन शिरोळ तालुक्यात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर नदीकडच्या गावातील लोकांचे स्थलांतर केले आहे.
हवामान विभागाने आज रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, ठाणे, कोल्हापूर, सातारा आणि अमरावती या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.