लोणी काळभोर, (पुणे) : अष्टविनायक तीर्थक्षेत्रापैकी प्रख्यात धार्मिक स्थळ असलेल्या श्री क्षेत्र थेऊर (ता. हवेली ) येथील चिंतामणी मंदिरात संकष्टी चतुर्थीनिमित्त शनिवारी (ता. १२) चिंतामणीच्या दर्शनासाठी हजारो भाविक दाखल झाले होते. सकाळपासून दर्शनासाठी भाविकांच्या लांब रांगा लागल्या होत्या. मंदिर परिसराला जणूकाही यात्रेचे स्वरूप आले होते.
चिंचवड देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त आनंद महाराज तांबे म्हणाले, पहाटे चार वाजण्याच्या सुमारास चेतन आगलावे यांच्या हस्ते ‘श्रीं’ ची पूजा करून सकाळी सहा वाजल्यापासून मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी खुले करण्यात आले. संकष्टी चतुर्थीनिमित्त मंदिरात विविध प्रकारची फुले वापरून आकर्षक रांगोळी, फुलांची आरास, पायघड्या सावलीसाठी मंडप व्यवस्था तसेच भाविकांसाठी स्वच्छतागृहाची व्यवस्था करण्यात आली होती. आगलावे बंधूंच्या वतीने पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आल होती. तसेच दुपारी भाविकांना देवस्थानच्या वतीने उपवासाची खिचडीचे वाटप करण्यात आले.
लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिर परिसरात पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. तसेच थेऊर ग्रामपंचायतीतर्फे पार्किंगची व्यवस्था करण्यात आली होती. आनंद महाराज तांबे हे मंदिर परिसरात लक्ष देऊन होते.