– ओमकार भोरडे
तळेगाव ढमढेरे : शिरुर तालुक्यातील निमगाव म्हाळुंगी येथे बिबट्याने (दि.27 जुलै) पहाटेच्या सुमारास गायीच्या गोठ्यावरती हल्ला केला. त्या हल्ल्यात एक वासरु ठार झाले आहे. शनिवारी सकाळी ही घटना उघडकीस आली आहे. या घटनेत शेतक-यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
शिवाजी विठ्ठल पवार, निमगाव म्हाळुंगी, पवार वस्ती यांच्या गोठ्यात गाईचे वासरु दिसून आले नाही. त्यावेळी त्यांनी आजुबाजूला शेतात पाहणी केले असता त्यांना शेजारच्या शेतातून बिबट्या पळून जाताना दिसला.
निमगाव म्हाळुंगी, पारोडी, विठ्ठलवाडी, न्हावरे, टाकळी, भिमा सातकरवाडी, इंगळे नगर, दहिवडी शिरूर तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये या बिबट्याचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचे सर्रास दर्शन होत आहे. परिसरात कुत्री, वासरे व शेळ्यांवर हल्ला केल्याच्या अनेक घटना घडल्या आहे.
परंतु शनिवारी पहाटे बिबट्याने निमगाव म्हाळुंगी येथील पवार वस्ती परिसरात अक्षरशः हैदोस घातला आहे. बिबट्याने गाईच्या गोठ्यावरती हल्ला केला. लोकवस्तीमध्ये बिबट्याच्या असलेल्या बिनधास्त वावरामुळे शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. अशातच गोठ्यामध्ये घुसून पाळीव जनावरांवर बिबट्या कडून होणाऱ्या या हल्ल्यामुळे परिसरात अधिकच भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. दहशत निर्माण करणाऱ्या या बिबट्याचा तातडीने वनविभागाने बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांसह शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
निमगाव म्हाळुंगी गावचे सरपंच बापूसाहेब बबनराव काळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, शिरूर तालुक्यात सतत बिबट्याचा वावर सुरु आहे. त्यामुळे वन विभागाने पिंजऱ्यांची संख्या वाढवून बिबट्यांना लोक वस्तीपासून हद्दपार करणे गरजेचे आहे. गावामध्ये लावले जाणारे पिंजरे हे वन विभागाने स्वखर्चाने लावण्याची तरतूद करण्यात यावी. वन विभागाकडून अद्याप पिंजरा लावण्यात आलेला नाही.
शिरूर तालुक्यातील पिंजऱ्याची संख्या वाढवावी. निमगाव म्हाळुंगी गावामध्ये पिंजरा न लावल्यास ग्रामस्थांसह शिरूर येथील वन विभागाच्या कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा, निमगाव म्हाळुंगी गावचे सरपंच बापूसाहेब काळे यांनी दिला आहे.