नाशिक : स्थानबद्धतेच्या कारवाईत कारागृहातून बाहेर पडताच सराईतांनी शरणपूररोड भागात भव्य मिरवणूक काढल्याचा प्रकार समोर आला आहे. चारचाकीसह १० ते १५ दुचाकीधारकांनी आरडाओरड व हॉर्नच्या कणकर्कश आवाजात ही मिरवणूक काढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले होते. परिसरात आपली दहशत कायम राहावी, या उद्देशाने पूर्वपरवानगी न घेता काढलेल्या या मिरवणुकीत तडीपारांसह शहरातील गुन्हेगार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात मनाई आदेशाच्या उल्लंघनासह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हर्षद सुनील पाटणकर, गोपाल नागोरकर, शॉन मायकल, जॉय मायकल, रॉविनसन बत्तिसे, वैभव खंडारे, विकास नेपाळी, वेदांत चाळद (सर्व रा. बेथले नगर, शरणपूर) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.