पुणे : गेल्या दोन दिवसांपासून पुणे जिल्ह्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. अतिवृष्टीमुळे नदी- नाल्यांना पूर आला आहे. तर काही गावांचा संपर्क तुटला आहे. त्यामुळे पुणे शहरासह जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर करण्याचे आदेश उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांना दिले आहेत.
पुणे जिल्हा व पुणे शहरामध्ये सातत्याने मुसळधार पाऊस पडत आहे. त्यातही पुणे जिल्ह्यातील मुळशी, मावळ, खेड, वेल्हे व भोर या तालुक्यामध्ये मोठ्या अतिवृष्टी झाल्यामुळे खडकवासला, पवना या धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. त्यामुळे पुणे शहरातून मुळा व मुठा नद्यांना मोठ्या प्रमाणात पूर आलेला आहे. त्यामुळे पुणे शहरातील अनेक सखल भागात, झोपडपट्ट्यांमध्ये व अनेक सोसायट्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पुराचे पाणी शिरले आहे. तसेच अतिवृष्टी व पुरामुळे शहरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे वाहतूक संथ व धोकादायक झाली आहे.
पुणे शहर व पुणे जिल्ह्यातील शाळांना 25 जुलै रोजी अतिवृष्टी व पुरामुळे सुट्टी असल्याचे जिल्हाधिका-यांनी सकाळी जाहीर केले परंतु याची माहिती शाळा व्यवस्थापन, पालक व विद्यार्थ्यांना वेळेवर न मिळाल्यामुळे अनेक पालकांची व विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात तारांबळ उडाली होती. त्यामुळे शाळा व्यवस्थापन, पालक व विद्यार्थ्यांना उद्याही याचा त्रास होऊ नये. तसेच पालकवर्ग व विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून शाळेत जाण्याची आवश्यकता पडणार नाही, यासाठी शाळांना उद्याची सुट्टी आजच जाहीर करावी, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत.