सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नांदण्यासाठी सासरी येण्यास टाळाटाळ करून गावातच माहेरी राहणाऱ्या पत्नीचा सुपारी देऊन खून केल्याची घटना घडली आहे. ही घटना करमाळा तालुक्यातील पोंधवडे गावात घडली आहे. याप्रकरणी आरोपी पतीसह सहाजणांना करमाळा पोलिसांनी अटक केली आहे. कोमल बिभीषण मत्रे (वय २३) असे खून झालेल्या विवाहितेचे नाव आहे.
याप्रकरणी मृत कोमलची आई अलकाबाई सौदागर वाघ यांनी करमाळा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून बिभीषण मत्रे याच्यासह खुनाची सुपारी घेणारे रोहन प्रदीप मोरे (वय-२०, जलालपूर, ता. कर्जत, जि. आहमदनगर), सुनील विष्णू शिंदे (वय-३९), प्रदीप ऊर्फ दीपक सुनील हिरभगत (वय-३२), ऋषिकेश ऊर्फ बच्चन अनिल शिंदे (वय-२२, तिघे रा. भांबोरा, ता. कर्जत), विशाल ऊर्फ सोन्या परशुराम सवाणे (वय-२३, रा. जाचक वस्ती, इंदापूर, सध्या रा. भांबोरा, ता. कर्जत) या सहाजणांना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत कोमल हिचा विवाह तिच्याच गावातील बिभीषण मत्रे याच्याबरोबर २०१७ साली झाला होता. मात्र, नंतर कौटुंबिक कारणांवरून सतत वाद होत असल्याने कोमल तीन वर्षांपासून माहेरी राहात होती. ती नांदण्यासाठी नकार देत होती. मुलांना भेटण्यासही ती विरोध करीत होती. अशातच तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन पती बिभीषण याने भांडण काढले होते. त्याबाबतचा खटला न्यायालयात प्रलंबित असून अंतिम टप्प्यात असलेल्या खटल्यात निकाल विरोधात जाण्याची बिभीषणला भीती वाटत होती.
यातच पत्नी कोमल ही आपला खून करणार असल्याच्या संशय त्याला येत होता. तिने आपला खून करण्याअगोदर मीच तिचा खून करणार असल्याचे तो गावात सांगत होता. दरम्यान, कोमलचा तिच्या माहेरी जाऊन कोयत्यांनी वार करून निर्घृण खून केला. करमाळा पोलीस पुढील तपास करीत आहेत.