पुणे : पुण्यातील कोंढवा पोलीस ठाण्यात महिला पोलीस हवालदाराला ‘तू पोलीस ठाण्याच्या बाहेर ये तुझ्याकडे बघते’ अशी धमकी देत धक्काबुक्की केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार शीतल लक्ष्मण जमदाडे (वय-४०) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून साबिया इरम अक्रम खान या महिलेविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २२ जुलै रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास कोंढवा पोलीस ठाण्यात घडली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साबिया खान हिच्याविरुद्ध नौशीन फैय्याज शेख यांनी तक्रार दिली होती. किरकोळ वादातून तक्रार दिल्याने पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली होती. २२ जुलै च्या रात्री साबिया कोंढवा पोलीस ठाण्यात आली होती. तिने पोलीस ठाण्याचे कामकाज सांभाळणारे पोलीस उपनिरीक्षक बालाजी डिगोळे यांच्याशी वाद घातला.
त्यावेळी ‘तुम्ही दहावी उत्तीर्ण पोलीस आहात. आमच्यामुळे तुमचा पगार होतो. मी उच्चशिक्षित असून, तुमची पोलीस आयुक्तांकडे तक्रार करणार आहे’, अशी धमकी तिने बालाजी डिगोळे यांना दिली. त्यानंतर पोलीस ठाण्यात अरेरावी करून तिने गोंधळ घातला. साबिया खानने पोलीस ठाण्यात ठेवलेल्या गुन्हे नोंदविण्याच्या वहीचे पान फाडले.
त्यावेळी जमदाडे यांनी तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. तेव्हा तिने जमदाडे यांच्या कानाखाली लगावली. ‘तू पोलीस ठाण्याच्या बाहेर ये तुझ्याकडे बघते’ अशी धमकी दिली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक स्नेहल जाधव अधिक तपास करीत आहेत.