उरुळी कांचन : नागरिकांच्या सुरक्षेच्या दुष्टीकोनातून विहिरीला कोणतीही तटबंदी नसल्याचा धक्कादायक प्रकार उरुळी कांचन (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील साई नगर परिसरात उघडकीस आला आहे. यामुळे नागरिकांसह चालकांचा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तसेच एखादी मोठी दुर्घटना घडल्यावरच प्रशासन कारवाई करणार का? असाही सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उरुळी कांचन येथील तुपे वस्तीच्या परिसरात ही विहीर आहे. रस्त्याच्या जवळच ही विहीर खोदण्यात आली आहे. या परिसराला साई नगर म्हणतात. तर या ठिकाणी वाहनांची वर्दळ सारखीच असते. तसेच तुपे वस्ती परिसरात लहान मुलांची अंगणवाडीही आहे. या पूर्व प्राथमिक शाळेत लहान मुले मोठ्या प्रमाणात शिक्षणासाठी येत असतात.
मुलांना शाळेत येण्यासाठी व जाण्यासाठी तुपेवस्ती येथील एकमेव रस्त्याचा वापर करावा लागत आहे. सध्या पावसाचे दिवस आहेत. त्यामुळे या रस्त्यावरून जाताना अनावधानाने मुले विहिरीत पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच रात्रीच्या वेळेस दोन गाड्या या ठिकाणी पासिंग होताच, एखादी गाडी विहिरीत पडून मोठी दुर्घटना होऊ शकते. कोणतीही दुर्घटना घडण्याअगोदर प्रशासनाने उपयोजना कराव्यात. व संबंधित शेतकऱ्यावर कारवाई करावी. अशी मागणी नागरिकांनी केली आहे.