अजित जगताप
सातारा : छत्रपती शिवाजी महाराज यांची राजधानी असलेल्या साताऱ्यात कायदा व सुव्यवस्था म्हणजे झुलता मनोरा झाला आहे. नियम न पाळता बेकायदेशीरपणे गोष्टी घडत आहेत.
काल साताऱ्यात नियम धाब्यावर बसवून बाईक रॅली काढण्यात आली. त्यावर कारवाई करण्याची गरज असताना कौतुकाचा वर्षाव होऊ लागला आहे.
याबाबत माहिती अशी की,भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे प्रथमच सातारा शहरात आले होते. त्याचे स्वागत करण्यासाठी भाजप खासदार- आमदार व समर्थकांनी मोठी बाईक रॅली काढली होती. त्याबरोबरीने एकाच दुचाकीवर तिघे जण, कर्णकर्कश हॉर्नचे आवाज, विनाहेल्मेट असणारे अनेक दुचाकीस्वार सहभागी झाले होते.
या रॅलीला कुठेही अडथळा निर्माण होऊ नये म्हणून रस्त्यालगतच्या गोरगरीब फेरीवाल्यांना हुसकावून लावण्यात आले होते. त्यांचा रोजगार बुडाला पण, धाडसी पत्रकारांच्या व्यतिरिक्त इतरांनी हा प्रश्न उपस्थित केला नाही.
सातारा शहरात वाहतुकीचे नियम तोडल्याने काही महिन्यांपूर्वी प्रसिद्ध अभिनेता आमिर खान यांच्यावर दणक्यात कारवाई करण्यात आली होती. पण,काल वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून रॅली काढण्यात आली होती. त्यासाठी वाहतूक कोंडी होऊनही कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.
इतरांना मात्र, दंड वसूल करून वाहतूक पोलीस यंत्रणेने कर्तव्यदक्ष भूमिका बजावली होती. त्याचे ही अनेकांनी कौतुक करून चांगलीच दाद दिली आहे.