नवी दिल्ली: नीट-यूजी पेपरफुटी प्रकरणानंतर ही परीक्षा पुन्हा एकदा घेण्यात यावी, अशी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर सुनावणी घेत असताना फेरपरीक्षा घेण्याची मागणी सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली आहे. पेपरफुटी प्रकरण हे पूर्वनियोजित असल्याचा कोणताही पुरावा मिळाला नसल्याचे देखील न्यायालयाने स्पष्ट केले आहे. सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील तीन न्यायाधीशाच्या खंडपीठाने हा निर्णय मंगळवारी दिला.
नीट-यूजी पेपरफुटी प्रकरणी निकाल देताना सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी सांगितले, नॅशसनल टेस्टिंग एजन्सी आणि आयआयटी मद्रासने दिलेला अहवाल तपासल्यानंतर लक्षात येते की, पेपरफुटी प्रकरणाची व्याप्ती फार मोठी नाही. “सध्या उपलब्ध असलेल्या पुराव्याच्या आधारे पेपरफुटी प्रकरण हे सुनियोजित पद्धतीने राबवविले गेले, असल्याचे सिद्ध होत नाही. त्यामुळे या परीक्षेचे पावित्र्य भंग झाले, असा निष्कर्ष काढता येणार नाही”, असे देखील सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी म्हटले आहे.
तसेच हजारीबाग आणि पाटणा येथे पेपरफुटी झाली याबाबतही आम्हाला कोणताही संशय नाही. त्याठिकाणी निश्चित पेपरफुटी झाली आहे, असेही खंडपीठाने सांगितले. सीबीआयच्या अहवालानुसार केवळ या दोन परीक्षा केंद्रावरील १५५ विद्यार्थ्यांच्या पलीकडे आणखी काही लाभार्थी असण्याची शक्यता कमी आहे, असेही न्यायालयाने म्हटले आहे.