पुणे : गेल्या काही दिवसांपासून सगळीकडे पावसाचा जोर वाढला आहे. त्यात पुण्यातही पावसाने दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये चांगला पाऊस होत असल्याने पुणेकरांच्या पाण्याची चिंता मिटली आहे. मात्र, असे असले तरी येत्या गुरुवारी पुण्यातील काही भागातील पाणी पुरवठा हा बंद राहणार आहे.
पर्वती जलकेंद्राअंतर्गत 600 मिलिमीटर जलवाहिनीतून होत असलेली गळती थांबविण्यासाठी येत्या गुरुवारी (दि. 25) देखभाल दुरुस्तीची कामे हाती घेतली जाणार आहे. या कामामुळे शहराच्या पूर्व भागातील काही पेठा व लगतच्या परिसराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. या जलवाहिनीतुन पाणी पुरवठा होणाऱ्या सर्व भागाला शुक्रवारी सकाळी उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा केला जाणार आहे.
या कामामुळे शंकरशेठ रस्ता परिसर, गुरुवार पेठ, बुधवार पेठ, कासेवाडी, क्वार्टरगेट परिसर, गंज पेठ, भवानी पेठ, नाना पेठ, लोहिया नगर, सोमवार पेठ, अरुण वैद्य स्टेडियम परिसर, घोरपडे पेठ, लक्ष्मीनारायण टॉकिज मागील परिसर, पर्वती दर्शनचा काही भाग, मित्रमंडळ कॉलनीचा काही भाग, सारसबाग परिसर, खडकमाळ आळी, शिवाजी रोड परिसर, मुकुंदनगर, महर्षीनगरचा काही भाग, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ कॉलनी, मीनाताई ठाकरे औद्योगिक वसाहत, अप्सरा टॉकिज परिसर, मीरा आनंद परिसर, श्रेयस सोसायटी या भागाचा पाणीपुरवठा बंद राहणार असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख नंदकिशोर जगताप यांनी दिली आहे.
दरम्यान, पुण्यातील नागरिकांनी याची दखल घेऊन पाणी योग्य वापरावे, असे आवाहन पुणे महानगर पालिकेच्या पाणी पुरवठा विभागातर्फे करण्यात आले आहे.