मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. दरम्यान, आता शिवसेना (ठाकरे गट) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हेदेखील सक्रिय झाले आहेत. ते पुढच्या महिन्यात तीन तारखेला पुणे दौरा तर चार तारखेला दिल्लीचा दौरा करणार आहेत.
राज्यातील जास्तीत जास्त लोकांपर्यंत पक्षाचे नाव आणि पक्षचिन्ह पोहोचावे यासाठी शिवसेना (ठाकरे गट) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे प्रयत्न करत आहेत. ते पुढील काळात जास्तीत जास्त लोकांशी संपर्क साधणार आहेत. त्यासाठी उद्धव ठाकरे यांनी दौरे सुरु केले आहेत.
पुण्यात 3 ऑगस्ट रोजी ठाकरे गटाकडून पदाधिकाऱ्यांचे शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला शिवसेना (ठाकरे गट) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत. यावेळी कार्यक्रमाला उपस्थित राहून ते पदाधिकाऱ्यांना योग्य ते मार्गदर्शन करणार आहेत.
या शिबिराला पुणे जिल्ह्यातील आणि पश्चिम महाराष्ट्रातील जिल्हाप्रमुख आणि पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाकडून या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.