पुणे : उत्पादनातून मोठा आर्थिक नफा मिळवून देण्याचे प्रलोभन दाखवत तिघांनी एका ६५ वर्षीय डॉक्टरांना गुंतवणूक करण्यास भाग पाडून दहा कोटींचा गंडा घातला. हायब्रीड पॉवर पॅक (एच.पी.पी.) गाड्यात वापरण्यात येणाऱ्या बॅटरीच्या संदर्भात प्रोडक्ट निर्मिती करण्याच्या बहाण्याने ही फसवणूक केली आहे.
याप्रकरणी डेक्कन पोलिसांनी तीन जणांवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार २४ एप्रिल २०१८ ते १७ जुलै २०२४ या कालावधीत फिर्यादी यांच्या राहत्या घरी घडला आहे. याबाबत डॉ. सुहास दामोदर साठे (६५, रा. नयनतारा, भंडारकर रोड) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार हेमंत रोहेरा, पिंकी रोहेरा (दोघे रा. फ्लेमिंगो रहेजा गार्डन, वानवडी) आणि ज्योती कलसी (रा. गोल्डन कॅस्केड, वाकड रोड) यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
आरोपी आणि फिर्यादी पूर्वीपासून एकमेकांच्या ओळखीचे आहेत. आरोपींनी फिर्यादींना सांगितले की, कार, ट्रक, मोटार सायकल, जनरेटर यामध्ये लेड बॅटऱ्या असतात. त्याऐवजी हायब्रीड पॉवर पॅक बॅटरीचा वापर करता येऊ शकतो. तसेच याच्या उत्पादनासाठी येणारा खर्च लीड बॅटरीपेक्षा ३० ते ४० टक्के कमी आहे. हायब्रीड पॉवर पॅक प्रोडक्टच्या तंत्रज्ञानाच्या उत्पादनासाठी तांत्रिक ज्ञान व लेड स्मॅल्टिंग प्लॅन्ट सुरू करणार असून, तसेच ऑर्डर असल्याचे देखील आरोपींनी फिर्यादी यांना म्हटले.
एच.पी.पी. बॅटरी प्रोजेक्टची वेगवेगळ्या मल्टी नॅशनल कंपन्यांनी तपासणी केली असून, या कंपन्या प्रॉडक्टचे उत्पादन करण्यास व खरेदी करण्यास तयार असल्याचे आरोपींनी फिर्यादी यांना सांगितले. यातून मोठा आर्थिक लाभ होईल, असे आमिष डॉ. साठे यांना दाखवले. दरम्यान, प्रकल्प सुरू करण्यासाठी किमान ८ कोटी ६३ लाख रुपयांची गरज असल्याचे फिर्यादी यांना सांगितले. फिर्यादी यांनी पैसे गुंतवण्यास तयारी दर्शवल्यावर त्यांच्या समजुतीचा करार (एमओयू) झाला. त्यानुसार आरोपींनी फिर्यादी यांच्याकडून स्वतःच्या बँक खात्यात १० कोटी रुपये घेतले. पैसे घेतल्यानंतर फिर्यादी यांना बॅटरी प्रोडक्ट, तसेच गुंतवलेले पैसे परत न करता आर्थिक फसवणूक केली.