पुणे : राज्याच्या बहुतांश भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. हवामान विभागाकडून अनेक जिल्ह्यांमध्ये आज अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आज राज्यातील रायगड, रत्नागिरी, सातार जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याचबरोबर कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यासह उत्तर मध्य महाराष्ट्रात मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून पुणे जिल्ह्याला देखील आज अलर्ट जारी करण्यात आला आहे. आज पुण्यामध्ये घाटमाथ्यावरील भागात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून हवामान विभागाकडून पुण्यासाठी ऑरेंज अलर्ट दिला आहे.
राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मध्यम ते मुसळधार पावसाच्या सरी बरसत आहेत. पुणे शहरासह घाटमाथ्यावर देखील मुसळधार पावसाने हजेरी लावली. पुणे शहर परिसराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण परिसर क्षेत्रात देखील मुसळधार पावसाने हजेरी लावली. राज्यातील धरणातील पाणीसाठ्यात काही प्रमाणात वाढ झाल्याचे चित्र दिसून येत आहे.
मुंबई शहरात मुसळधार पाऊस
मुंबई शहरासह पश्चिम उपनगरात आज सकाळपासून मुसळधा पावसाला सुरवात झाली आहे. जोरदार पाऊस असल्यामुळे अंधेरी सबवे खाली दोन ते तीन फूट पाणी भरले आहे. त्यामुळे अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. पश्चिम उपनगरात आज सकाळपासून जोरदार पाऊस असल्यामुळे सखल भागांमध्ये देखील पाणी भरायला सुरुवात झाला आहे.
या भागात रेड अलर्ट
हिंगोली, नांदेड, परभणी या जिल्ह्यांना ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. तर आज अहमदनगर, जालना, नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांनाही दक्षतेचा इशारा दिला आहे. प्रामुख्याने ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना शुक्रवारी अलर्ट जारी केला आहे, तर रायगड, रत्नागिरी, सातारा जिल्ह्यांमध्ये उद्या (ता. 19) दोन दिवस ‘रेड अलर्ट’ देण्यात आला आहे.
‘या’ भागात मुसळधार पावसाची शक्यता
हवामान विभागाकडून रत्नागिरी, सातारा, भंडारा, गडचिरोली आणि गोंदिया या ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. या सर्व जिल्ह्यांमध्ये आज रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर कोकणातही आज मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पालघर, ठाणे, रायगड, सिंधुदूर्ग या जिल्ह्यांमधील काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.