पिंपरी : पिंपरी-चिंचवडमधील मुख्य आणि अंतर्गत रस्त्यांवरील खड्डे बुजवून नागरिकांचा प्रवास सुखाचा झाला पाहिजे. त्यासाठी ‘खड्डे मुक्त पिंपरी-चिंचवड’ मोहीम प्रभावीपणे राबवण्यात यावी. येत्या १५ डिसेंबरपर्यंत शहर खड्डेमुक्त झाले पाहिजे, असा ‘अल्टिमेटम’ भाजपा शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे यांनी दिला आहे. त्यानंतर तातडीने महापालिका प्रशासन कामाला लागले.
पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांना रस्त्यांवरील खड्डयांपासून होणाऱ्या त्रासातून मुक्तता करण्याबाबत उपाययोजना करण्याचे निर्देश महापालिका प्रशासनाला दिले होते.
या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड महापालिका भवनात आमदार महेश लांडगे यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. यावेळी प्रशासक व आयुक्त शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ, प्रदीप जांभळे-पाटील, मुख्य लेखा व वित्त अधिकारी जितेंद्र कोळंबे, वैद्यकीय अधिकारी लक्ष्मण गोफणे, शिक्षण विभागाचे उपायुक्त संदीप खोत, प्रशासन अधिकारी संजय नायकडे उपस्थित होते.
आमदार महेश लांडगे म्हणाले की, शहरातील अंतर्गत व मुख्य रस्ते हे प्रभावीपणे खड्डेमुक्त संकल्पना राबवावी. केवळ मुख्य रस्त्यांवर ‘फोकस’ अंतर्गत रस्त्यांची दुरूस्ती करण्यासाठीही भर देण्यात यावा. त्यानुसार योग्य नियोजन आणि प्रभागनिहाय, क्षेत्रीय कार्यालय निहाय कालबद्ध कार्यक्रम तयार करुन निर्धारित वेळेत रस्ते खड्डेमुक्त करावेत. तसेच शहरातील नागरिकांनी या मोहिमेत सहभागी होत खड्डे निदर्शनास आल्यास ‘सारथी’ आणि ‘परिवर्तन’ हेल्पलाईनला फोटो लोकेशनसह पाठवावा. त्यावर तात्काळ कार्यवाही करण्यात येईल, असे आवाहनही आमदार लांडगे यांनी केले.
आयुक्त शेखर सिंह म्हणाले की, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलेल्या सूचनेनुसार, महापालिका स्तरावर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा झाली आहे. त्यानुसार नियोजन करण्यात आले आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील खड्डे बुजवण्याची मोहीम तीव्र करण्यात येणार आहे.
पावसाळा संपल्यामुळे डांबर प्लँन्ट पूर्ण क्षमतेने सुरू झाले आहेत. त्यानुसार तरतूद करून ठेवली आहे. येत्या १५ डिसेंबरपर्यंत शहरात एकही खड्डा राहणार नाही. याची पूर्ण काळजी घेण्यात येणार आहे. नागरिकांनी प्रशासनला सहकार्य करावे. : मकरंद निकम, शहर अभियंता, स्थापत्य विभाग.