पुणे : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेंतर्गत पात्र लाभार्थी महिलांकडून अर्ज भरून घेण्याची प्रक्रिया वेगाने राबविली जात आहे. त्यानुसार जिल्ह्यातून आतापर्यंत दोन लाख अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी १ लाख ३३ हजार ऑफलाइन आणि सुमारे ७५ हजार ऑनलाइन अर्ज प्राप्त झाले आहेत.
‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेंतर्गत जिल्ह्यात विविध ठिकाणी अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने अर्ज भरण्यासाठी स्वतंत्र केंद्र स्थापन केले आहे. जिल्ह्यातील इतर स्थानिक स्वराज्य संस्थांनीदेखील यासाठी विशेष व्यवस्था केली आहे. अंगणवाडी स्तरावरदेखील अर्ज भरून घेण्यात येत आहेत. अर्ज भरण्यासाठी आयोजित शिविरांच्या माध्यमातून महिलांना अर्जासोबत लागणाऱ्या आवश्यक कागदपत्रांविषयी मार्गदर्शन करण्यात येत आहे.
कुटुंबाचे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असलेल्या पात्र महिलांकडून येत्या ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज भरून घेतले जाणार आहेत. अर्ज भरल्यानंतर पात्र महिलांच्या बँक खात्यावर जुलै महिन्यापासून दरमहा १ हजार ५०० रुपये लाभ जमा करण्यात येणार आहेत. ही प्रक्रिया १५ ऑगस्टपासून सुरू करण्यात येईल. प्रत्येक पात्र महिलेस योजनेचा लाभ मिळावा यासाठी प्रशासनातर्फे योजनेची व्यापक प्रमाणात प्रसिद्धीदेखील करण्यात येत आहे.
योजनेच्या लाभापासून एकही पात्र महिला वंचित राहू नये यासाठी गावपातळीवर नियोजन करण्यात आले असून, महिलांनी सेतू सुविधा केंद्र, नारी शक्ती दूत अॅप, नगरपालिका व महापालिकेचे वॉर्ड कार्यालय किंवा अंगणवाडी कार्यालयात अर्ज सादर करावे, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी मोनिका रंधवे यांनी केले आहे.