नवी दिल्ली : कोल्हापूर जिल्ह्यातील किल्ले विशाळगडावरील अतिक्रमणाचा मुद्दा सद्या चर्चेत आहे. विशाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या गजापुरामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये हिंसाचार झाला होता. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नासधूस करण्यात आली होती तसेच प्रार्थनास्थळावरही हल्ला करण्यात आला होता. या सर्व प्रकरणानंतर राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजप-आरएसएसवर टीका केली आहे. दंगली हेच भाजपचं धोरण आहे. राज्यात जातीय दंगली केल्याशिवाय निवडणुका जिंकता येणार नाहीत हे भाजप, आरएसएसचं धोरण आहे. अशी टीका देखील पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. ते नवी दिल्लीत बोलत होते.
पृथ्वीराज चव्हाणांचा अजित पवारांना टोला..
अजित पवार आज सायंकाळी गडावर पोहोचणार आहेत. यावर पृथ्वीराज चव्हाणांनी अजित पवारांना देखील टोला लगावला आहे. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, दिखावा करणे महत्वाचं नाही, अॅक्शन घेणं महत्त्वाचं आहे. राज्य पेटले तर त्याचा परिणाम उद्योग, नोकऱ्यांवर होईल. राज्यात सुरु असलेल जातीय ध्रुवीकरण थांबले पाहिजे. शांतता प्रस्थापित करणे ही सरकारची जबाबदारी आहे.
दिवा विझताना फडफडतो, राज्य सरकारची तशीच स्थिती..
राज्यातील सद्य परिस्थितीवर पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, दिवा विझताना फडफडतो, राज्य सरकारची तशीच स्थिती आहे. युपीए सरकारने कायदा करून योजनांचा लाभ द्या अस सांगितल होते. आज घोषणा केलेली लाडकी बहीण योजना चांगली पण उद्या निवडणुका झाल्यावर काय? घोषणा करा पण त्याला कायद्याचा आधार द्या. योजना जाहीर करायच्या पण अंमलबजावणीची जबाबदारी कोणाची? आर्थिक स्थिती नसताना अशा घोषणा का? जुलै महिन्यात बजेट अधिवेशनात फक्त घोषणा होत्या, त्या तुम्हाला बाहेरही करता आल्या असत्या.
राज्यावर आणखी किती कर्ज काढणार आहेत? या फक्त पोकळ घोषणा आहे. 1 कोटीची घोषणा करायची आणि तरतूद करायची 10 लाखांची अशी ही परिस्थिती आहे. सरकार उद्योगधांद्याबाबत अधिवेशनात म्हणाले होते आम्ही श्वेतपत्रिका काढू पण ती कधी काढणार त्यावर काहीच सांगत नाहीत. धारावी पुनर्विकास प्रकल्प मध्ये मोठा स्कॅम आहे, त्याचीही श्वेतपत्रिका काढू म्हणाले पण ती निवडणुकीपूर्वी काढावी. या सगळ्या घोषणा मतांसाठी होत आहेत. असेही चव्हाण म्हणाले.
चेहरा आणि जागावाटप यावर चर्चा बंद खोलीत….
काँग्रेसच्या बैठकीवर पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, उद्या वरिष्ठ नेत्यांसोबत आमच्या दोन बैठका आहेत. निवडणुकीच्या पूर्वतयारीचा हा भाग आहे. चेहरा आणि जागावाटप यावर जाहीर चर्चा करता येणार नाही. यावर बंद खोलीत चर्चा करावी लागेल.