(अजित जगताप )
सातारा : राजकीय पटलावर तत्वनिष्ठ व शिस्त पाळणारा पक्ष अशी प्रतिमा जनसंघापासून भाजपापर्यंत ओळखली जात होती. आताची सातारा जिल्ह्यातील भाजप म्हणजे राष्ट्रीय काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस व इतर पक्षातील मातब्बर नेत्यांच्या महत्वकांक्षेसाठी पुनर्वसन केंद्र बनले आहे. तरीसुद्धा भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी भाजपची नाळ सोडली नाही. त्यांच्यामुळे सध्याचा भाजप पक्ष म्हणून उभा आहे. सातारा जिल्ह्यात भाजपमध्ये आयत्या नेत्यांना संधी मिळणार निष्ठावंतांना असा पेच प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या समोर उभा आहे.
गेल्या काही वर्षांपासून सातारा जिल्ह्यामध्ये इतर पक्षातून आलेल्या आयत्या नेत्यांच्या गुणगौरव करण्यामध्ये भाजपचे वरिष्ठ नेते कमी पडले नाहीत. आयात नेत्यांचे समर्थक भाजपचे निष्ठावंत म्हणून सर्वत्र वावरू लागल्यामुळे एखाद्या चारित्र्यवान कार्यकर्त्याला चहा पाण्याची व्यवस्था करण्यास सांगणे आणि ज्यांनी भाजपला यापूर्वी कधीच साथ दिली नाही अशांचे आदरातिथ्य करण्याचे आदेश दिले जात आहेत. भाजप म्हणजे तत्वनिष्ठ पक्ष परंतु सध्या व्यक्तीनिष्ठ पक्ष म्हणून भाजपमधील काही लोक वावरत आहेत.
भाजपमधील निष्ठावंत कार्यकर्ते आजही पक्षाची भूमिका समर्थपणे मांडत आहेत. परंतु ,त्यांना आता पक्षातच दुजाभाव मिळू लागला आहे. याची त्यांना खंत वाटत असली तरी पक्षासाठी ते सहन करत आहेत. हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. पक्ष वाढला पाहिजे, याबाबत कोणाचेही दुमत नाही. परंतु, सातारा जिल्ह्यात भाजप पक्षापेक्षा नेत्यांच्या समर्थकांचेच संख्या वाढू लागलेली आहे.
भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट एकत्र आल्यापासून सातारा जिल्ह्यामध्ये चैतन्याचे वातावरण पसरले आहे. असे असताना देखील घटक पक्ष असलेल्या रिपब्लिकन पक्षाला सोबत इतरांना डावलले जात आहे. विशेष म्हणजे पाटण व कोरेगाव या दोन विधानसभा मतदारसंघात भाजपच्या निष्ठावंतांना ताकद देणार की स्थानिक आमदारांना बळ देणार? याचे उत्तर सर्वसामान्य कार्यकर्त्याला देणे गरजेचे आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा सातारा दौरा हा सामान्य कार्यकर्त्यांसाठी आनंदाचा क्षण आहे. त्यामुळे आज होणाऱ्या या कार्यक्रमासाठी विक्रम पावसकर ,विठ्ठल बलशेठवार, निलेश नलावडे, विकास गोसावी, सुदर्शन पाटसकर, ऍड विशाल कुलकर्णी वगळता भाजपच्या निष्ठावंतांना या दौऱ्यात संधी मिळणे अपेक्षित होते. याबद्दल आता कुजबूज सुरू झाली असली तरी प्रदेश महामंत्री विक्रांत पाटील यांनी या दौऱ्याचे नियोजन केलेले आहे. भाजप पक्ष म्हणून वाढत असताना नव्या जुन्यांना एकत्र करावेच लागते.
सध्या सतरंजी उचलणारे कार्यकर्ते घराणेशाही व प्रस्थापित लोकांच्या सेवेसाठी अहोरात्र झटत आहेत. त्यांची भूमिका महत्त्वाची असली तरी पक्ष वाढीसाठी आवश्यक ज्या बाबी आहेत. त्यादेखील होणे गरजेचे आहे. खटाव तालुक्यातील शिरसवडी येथे भाजपची ग्रामपंचायत निवडून आली होती. ही किमया ज्या डॉ. दिलीप येळगावकरांनी केली होती ते आज अधिकृतरीत्या या दौऱ्यात कुठेही दिसत नाहीत.
खटाव तालुक्यातील भाजप निष्ठावंत सतीश शेट्टी, डॉ. हेमंत पेठे, डॉक्टर दिलीप येळगावकर,प्रदीप शेटे, विवेक येवले, नामदेव घाडगे यांनी रोपटं लावले होते. भूमिका पक्षासोबतच होती. त्याकाळी विचारात घेतले जात होते, ती परिस्थिती सध्या सातारा भाजपमध्ये नाही.