पुणे: पुणे पोलिसांकडून वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. तसेच उद्या पुणे पोलीस आयुक्त कार्यालयात हजर राहण्याचे आदेश पुणे पोलिसांनी दिले आहेत. पूजा खेडकर यांच्याकडून पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्यावर आरोप करण्यात आले होते. यावरून वाशीम पोलिसांनी त्यांची तक्रार नोंदवली होती. त्यानंतर ही तक्रार पुणे पोलिसांकडे वर्ग करण्यात आली आहे. आता पूजा खेडकर यांचा जबाब नोंदवण्यासाठी पूजा खेडकर यांना हजर राहण्याचे आदेश पुणे पोलिसांनी दिले आहेत.
दरम्यान पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी आपला मानसिक छळ केल्याची तक्रार पूजा खेडकर यांनी केली होती. पुण्यामध्ये प्रशिक्षणार्थी असताना हा छळ झाल्याचे खेडकर यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.
पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकरांच्या विरोधात राज्य सरकारला अहवाल दिल्यानंतर या प्रकरणाला वाचा फुटली होती. त्यानंतर पूजा खेडकरांची आता कार्मिक मंत्रालयाच्या समितीकडून चौकशी केली जात आहे. पूजा खेडकर यांचा प्रशिक्षणाचा कालावधी संपवण्यात आला असून त्यांना मसुरीतील प्रशिक्षण संस्थेत परत बोलावले आहे.