मुंबई: पॅरिस ऑलिम्पिक 26 जुलैपासून सुरू होत आहे. ऑलिम्पिकचे आयोजन करणे सोपे नाही. ऑलिम्पिक खेळांच्या आयोजनासाठी एकूण 61,500 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. यावेळी पॅरिस व्यतिरिक्त फ्रान्समधील 16 वेगवेगळ्या शहरांमध्ये या खेळांचे आयोजन करण्यात येणार आहे. ज्यामध्ये 10,000 हून अधिक खेळाडू सहभागी होणार आहेत. अनेक देशांतील खेळाडू अनेक वर्षांपासून ऑलिम्पिकची तयारी करतात. यासाठी पात्र होणे ही मोठी गोष्ट आहे. अशा परिस्थितीत खेळाडूने जर पदक जिंकले, तर त्याचे नाव इतिहासात नोंदवले जाते. ऑलिम्पिकमधील विजेत्यांना पदके मिळतात, पण त्याची किंमत किती असते, हे तुम्हाला माहीत आहे का?
पॅरिस ऑलिम्पिकसाठी डिझाइन केली आहेत विशेष पदके
ऑलिम्पिकमध्ये प्रथम क्रमांक पटकावणाऱ्याला सुवर्णपदक, दुसऱ्या क्रमांकाला रौप्यपदक आणि तिसऱ्या क्रमांकाला कांस्यपदक दिले जाते. यावेळी पॅरिस ऑलिम्पिकसाठी तयार करण्यात आलेल्या पदकात आयफेल टॉवरमधील लोखंडाचा तुकडा वापरण्यात आला आहे. प्रत्येक पदकात आयफेल टॉवरच्या तुकड्याचे वजन 18 ग्रॅम आहे. त्याची जाडी 9.2 मिमी आहे, तर व्यास 85 मिमी असेल.
एकूण तयार केलेल्या पदकांची संख्या
पॅरिस ऑलिम्पिक 2024 साठी एकूण 5084 पदके झाली आहेत. ज्यामध्ये सुवर्ण पदकाचे वजन 529 ग्रॅम आणि रौप्य पदकाचे वजन 525 ग्रॅम आहे. तर कांस्य पदक 455 ग्रॅमचे असेल. सुवर्ण पदक हे पूर्णपणे सोन्याने बनलेले नाही, त्यात 92.5 टक्के चांदी आणि फक्त 6 ग्रॅम सोने आहे. त्याचप्रमाणे रौप्य पदकामध्ये 92.5 टक्के सिल्व्हर आणि कांस्य पदकामध्ये 97 टक्के तांबे आहेत.
पॅरिस ऑलिम्पिक पदकाची किंमत
रिपोर्ट्सनुसार, पॅरिस ऑलिम्पिक 2024 साठी तयार केलेल्या सुवर्णपदकाची किंमत सुमारे $758 आहे. त्याची रुपयात किंमत जवळपास 63 हजार 357 रुपये आहे. त्याच वेळी, रौप्य पदकाची किंमत सुमारे 250 डॉलर्स म्हणजे 20,890 रुपये आणि कांस्य पदकाची किंमत सुमारे 5 डॉलर म्हणजे 417 रुपये आहे. तथापि, वितळलेल्या पदकांच्या तुलनेत सामान्य पदकांची किंमत जास्त असते.