पुणे : राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी बघायला मिळत आहे. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे.अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला पिंपरी चिंचवडमध्ये मोठा धक्का बसला आहे. अजित पवार यांच्या जवळच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची साथ सोडली आहे. पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामे काल (मंगळवारी) सुनील तटकरे यांच्याकडे सोपवले होते. आगामी निवडणुकीच्या तोंडावर पदाधिकाऱ्यांनी सोडलेली साथ अजित पवारांना मोठा धक्का मानला जात आहे. काल राजीनामे दिलेले पदाधिकारी आज शरद पवार गटात पक्षप्रवेश करणार आहेत
राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) शहराध्यक्ष आणि भोसरीतील माजी नगरसेवक अजित गव्हाणे यांनी आपल्या पदाचा काल राजीनामा दिला होता. त्यांच्यासोबतच, नेहरूनगर येथील माजी नगरसेवक आणि पक्षाचे शहर कार्याध्यक्ष राहुल भोसले, ताथवडे येथील माजी नगरसेवक आणि पक्षाचे भोसरी विधानसभा अध्यक्ष पंकज भालेकर, विद्यार्थी आघाडीचे शहराध्यक्ष आणि चिखली येथील सामाजिक कार्यकर्ते यश साने यांनी देखील आपल्या पदाचा राजीनामा काल (मंगळवारी) दिला आहे. ते सर्वच अजित पवारांचे कट्टर समर्थक होते. त्यांच्या या निर्णयाने पक्षाला मोठा धक्का बसल्याचे बोलले जात आहे.
शरद पवारांची घेतली होती भेट
अजित गव्हाणे यांनी काही माजी नगरसेवकांसह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची काही दिवसांपूर्वी भेट घेतली होती. तेव्हापासून राजकीय चर्चांना उधाण आलं होत. या नेत्यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांची साथ सोडत आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने त्यांचा पक्षप्रवेश ते शरद पवार यांच्या पक्षात जाणार असल्याते निश्चित झाल्याचे मानले जात होते. आज(बुधवारी) ते सर्व नेते शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करतील, अशी माहिती समोर आली आहे.
हे नेते शरद पवार यांच्या पक्षात आज पक्षप्रवेश करणार आहे.
- अजित गव्हाणे
- राहुल भोसले
- पंकज भालेकर
- समीर मासुळकर
- वसंत बोराटे
- विनया तापकीरघनश्याम खेडेकर
- दिवंगत दत्ता साने कुटुंबीय
- यश साने
- संगीता ताम्हणे