वाशिम : राज्यातील वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर प्रकरणाला आता वेगळे वळण मिळाले आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी आपला मानसिक छळ केल्याची तक्रार पूजा खेडकर यांनी केली आहे. पुण्यामध्ये प्रशिक्षणार्थी असताना हा छळ झाला असल्याची तक्रार खेडकरांनी केली आहे.
पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकरांच्या विरोधात राज्य सरकारला अहवाल दिल्यानंतर या प्रकरणाला वाचा फुटली होती. त्यानंतर पूजा खेडकरांची आता कार्मिक मंत्रालयाच्या समितीकडून चौकशी केली जात आहे. पूजा खेडकर यांचा प्रशिक्षणाचा कालावधी संपवण्यात आला असून त्यांना मसुरीतील प्रशिक्षण संस्थेत परत बोलावले आहे.