लोणी काळभोर : इराण, इराक व दुबई या आखाती देशाप्रमाणे पुणे शहरालगतच्या आळंदी म्हातोबाची (ता. हवेली) या गावातील एका शेतकऱ्यांच्या विहिरीला पिण्याच्या पाण्याबरोबर चक्क पेट्रोल-डिझेलचे झरे लागल्याचा आश्चर्यजनक प्रकार घडला होता. एका बड्या इंधनमाफियाने इंधनाची पाईपलाईन फोडली होती. त्याच्या या इंधनचोरीच्या प्रकारामुळे शेतकऱ्याच्या विहिरीला इंधनाचे झरे लागल्याची करामत झाली होती. या घटनेला एक वर्ष पूर्ण होण्यापूर्वीच आता तरडे (हवेली) येथील भारत पेट्रोलियम कंपनीच्या डेपोमधून बाहेर पडलेल्या टँकरच्या इंधन पुरवठा करणाऱ्या टाकीलाच डिझेल, पेट्रोलचे झरे लागल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
‘पुणे प्राईम न्यूज’च्या वाचकांनो ही बातमी वाचून आश्चर्यचकीत झालात ना. पण, ही बातमी शंभर नव्हे, तर एक लाख टक्के खरी आहे. ही किमया खरच घडली आहे. टँकरच्या टाकीला चक्क पेट्रोल-डिझेलचे झरे लागल्याचा व्हिडीओ पुणे प्राईम न्यूजच्या हाती लागला आहे. हे झालं कसं? याच कारण काय? या सर्व गोष्टींच गौडबंगाल काय? याबाबत अधिक माहिती घेतली असता, भारत पेट्रोलियम कंपनीच्या तरडे (ता. हवेली) येथील तेल डेपोमधून, कंपनीच्या सहाय्याने जिल्ह्यातील विविध पेट्रोल पंपाना टॅंकरमधुन पेट्रोल व डिझेल पुरवठा केला जातो. डेपोमधून बाहेर पडल्यानंतर काही ठराविक टँकर चालक टँकरमधून “अंडर पाईपलाईन सिस्टिम” च्या साह्याने हजारो लिटर पेट्रोल व डिझेलची चोरी करत असल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे.
लोणी काळभोर हद्दीतील हिंदुस्थान पेट्रोलियम व इंडीयन ऑईल या दोन तेल उत्पादक कंपनीच्या इंधन डेपोबरोबरच, भारत पेट्रोलियम कंपनीच्या तरडे येथील इंधन डेपोमधून थेट पंपाना पेट्रोल व डिझेलचा पुरवठा करणारे काही ठराविक टँकर मालक आणि चालक “अंडर पाईपलाईन सिस्टिम”च्या माध्यमातून शेकडो लिटर पेट्रोल व डिझेलची चोरी करत असल्याची चर्चा सुरु होती. या चर्चेला “पुणे प्राईम न्यूज”च्या हाती लागलेल्या व्हिडीओमुळे बळकटी आली आहे. विशेष म्हणजे “अंडर पाईपलाईन सिस्टिम”च्या माध्यमातून होणाऱ्या वरील इंधन चोरी प्रकरणात भारत पेट्रोलियम कंपनीच्या तरडे येथील इंधन डेपोमधील काहीजण सहभागी असल्याची चर्चा सुरु झाली आहे.
भारत पेट्रोलियम कंपनीच्या तरडे येथील इंधन डेपोमधून टॅंकरच्या माध्यमातून पुणे शहर, पिंपरी-चिंचवड, जिल्ह्यासह आसपासच्या जिल्ह्यातील हजारो पेट्रोल पंपाना पेट्रोल व डिझेलचा पुरठा केला जातो. तेल डेपोमधून पंपाना पेट्रोल व डिझेलचा पुरवठा करणारे हजारो टँकर आहेत. यातील काही टँकर चालक विविध प्रकारे टॅंकरमधील इंधनाची चोरी करत असल्याच्या बातम्या मागील काही वर्षांपासून झळकत आहेत. तर लोणी काळभोर पोलिस ठाण्यात मागील दहा वर्षांच्या काळात अनेक गुन्हेही दाखल झालेले आहेत. वर्षभरापुर्वी पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने तरडे येथील भारत पेट्रोलियम कंपनीच्या डेपोमधून बाहेर पडलेल्या टॅंकरमध्ये पेट्रोल व डिझेलच्या चोरीसाठी चोर कप्पे असल्याचा संशयावरुन एकवीस टॅंकर ताब्यात घेतले होते. त्यावेळी या चोरीच्या धंद्यात भारत पेट्रोलियम कंपनीचे काही वरीष्ठ अधिकारी सहभागी असल्याचा संशय पोलिसांनीही व्य़क्त केला होता. मात्र, वरील व्हिडीओ प्रकरणामुळे भारत पेट्रोलियम कंपनीचा तरडे येथील तेल डेपो व त्याचे अधिकारी चर्चेत आले आहेत.
“अंडर पाईपलाईन सिस्टिम”द्वारे अशी केली जाते चोरी…
इंधनवाहू टॅंकर ते थेट टॅंकरच्या टाकीपर्यंत कोणाच्याही लक्षात येणार नाही. याची काळजी घेऊन, एक छोटीसी पाईपलाईन टाकली जाते. या पाईपलाईनमधून इंधनाचा पुरवठा चालु बंद करता यावा, यासाठी टॅंकरच्या इंधन टाकीजवळ अथवा टॅंकरच्या केबीनमध्ये कॉक बसवला जातो. भारत पेट्रोलियम कंपनीच्या डेपोमधून टॅंकरमध्ये इंधन भरल्यानंतर, काही वेळातच या पाईपलाईनमधून दोनशे लिटरपासून ते चारशे लिटरपर्यंत हळूहळू टॅंकरच्या टाकीत जमा होते. त्यानंतर हे इंधन खुल्या बाजारात विकले जाते.
याबाबत भारत पेट्रोलियम कंपनीतून इंधन वाहतूक करणाऱ्या एका टँकर चालकाने दिलेल्या माहितीनुसार, केवळ भारत पेट्रोलियमच नव्हे, तर लोणी काळभोरमधील दोन्ही पेट्रोलियम कंपनीतील काही टँकर चालकांनी “अंडर पाईपलाईन सिस्टिम” बसवून घेतली आहे. वरील तीन पेट्रोलियम कंपनीशी वाहतूक करार असलेल्या टँकरपैकी दहा टक्क्यांहून अधिक टँकरमध्ये चोर कप्पे अथवा वरील सिस्टीम बसवलेली आहे. या माध्यमातून मोठी यंत्रणा कार्यरत आहे. भारत पेट्रोलियम कंपनीच्या तरडे येथील इंधन डेपोमध्ये मागील वीस दिवसांच्या काळात दोन टॅंकर कंपनीच्या अधिकाऱ्यांना वरील पध्दतीने इंधन चोरी करत असल्याचे आढळून आले होते. पहिला टँकर मोठ्या वाहतूकदारांचा असल्याने, कंपनीच्या एका वरीष्ठ अधिकाऱ्याने संबधित टॅंकर चालकाला अभय दिले. मात्र, वरील व्हिडीओत आढळून आलेल्या टॅंकरवर कारवाईचे नाटक करण्यात आले आहे. यामध्ये कंपनीचे काही अधिकारी सहभागी असल्याचा आरोप यावेळी संबधित टॅंकर चालकाने केला.
“अंडर पाईपलाईन सिस्टिम”चा आर्थिक फटका नेमका कोणाला..
पेट्रोलियम कंपन्यात टँकरमध्ये नेमके किती लिटर इंधन भरले, याचे मोजमाप तेल कंपन्यांच्या अत्याधुनिक यंत्रणेच्या माध्यमातून केले जाते. तर दुसरीकडे इंधनाची वाहतूक करणारा टॅंकर पेट्रोल पंपावर पोहचताच, पंप चालकांकडून विशिष्ट सळईच्या (डिप) च्या माध्यमातून टॅंकरमध्ये किती लिटर इंधन आहे, याची तपासणी केली जाते. तपासणीत पंप चालकाला योग्य वाटले तरच, इंधन खाली करण्यास परवागी दिली जाते. इंधन खाली केल्यानंतर पंप मालकाचा एक माणूस टॅंकरवर जाऊन टॅंकर खाली झाला का नाही? याची पहाणी करतो. मात्र, याच प्रवासात “अंडर पाईपलाईन सिस्टिम”च्या माध्यमातून टँकर चालक शंभर लिटरपासून ते थेट चारशे लिटरपर्यंत इंधनाची चोरी करतो, असा आरोप आहे. जर पंप चालकाला चोरीचा फटका बसत नसेल, तर याचा आर्थिक फटका तेल कंपन्यांना बसत असला पाहिजे. मात्र, चोरी कॅमेऱ्यात पकडली जाऊनही, कंपनीचे अधिकारी गप्प का? असा प्रश्न सध्या विचारला जात आहे.