मुंबई : वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांचा महाराष्ट्रातील जिल्हा प्रशिक्षण कालावधी थांबवण्याचे आदेश महाराष्ट्र शासनाने दिले आहेत. तसेच मसुरीतील प्रशिक्षण संस्थेत त्यांना परत बोलावण्यात आलं आहे. लाल बहादूर शास्त्रीय प्रशासकीय अकादमी यांनी दिलेल्या निर्देशानुसार महाराष्ट्र शासनाने ही कारवाई केली.
पुढील कारवाईसाठी कुठल्याही परिस्थितीत तत्काळ 23 जुलै पूर्वी मसूरी येथील लालबहादूर शास्त्री राष्ट्रीय अकॅडमीमध्ये पुन्हा हजर व्हावेच लागेल, असे आदेशही पूजा खेडकर यांना दिले आहेत.
खासगी गाडीवर लाल दिवा लावणे आणि स्वतंत्र केबिनसाठी आग्रह धरणे, यामुळे पूजा खेडकर चर्चेत आल्या होत्या. त्यानंतर खेडकर यांच्या शारीरिक अपंगत्व आणि ओबीसी प्रमाणपत्र बोगस असल्याचं देखील समोर आलं. तसेच पूजा खेडकर यांच्याकडे कोट्यवधींची संपत्ती असतानाही त्यांनी ओबीसी नॉन क्रिमी लेअर सर्टिफिकेट काढल्याचं समोर आलं.
याच मुद्द्यांवर पंतप्रधान कार्यालय आणि मसूरी येथील लाल बहादूर शास्त्रीय प्रशासकीय अकादमीने प्रोबेशनरी आयएस अधिकारी पूजा खेडकर यांची चौकशी सुरू केली आहे. आता या सर्व प्रकरणाची चौकशी केंद्र सरकार करणार आहे. केंद्र सरकारच्या कार्मिक मंत्रालयाने पूजा खेडकर प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एकसदस्यीय समिती नेमली आहे. या समितीने तपास सुरू केला असून दोन आठवड्यात त्याचा अहवाल मंत्रालयाला देण्यात येणार आहे.