पुणे : वादग्रस्त ट्रेनी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्याबाबत रोज नवनवीन खुलासे समोर येत आहे. आता यांचा आणखी एक कारनामा उघड झाला आहे. पूजा खेडकरने तब्बल 11 वेळा युपीएससीची परिक्षा दिल्याची माहिती पुढे आली आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाची (यूपीएससी) प्रयत्न करण्याची ठराविक मुदत संपल्यावर पूजा खेडकर यांनी नाव बदलून परीक्षा दिल्याचे समोर आले आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
यूपीएससी परीक्षेच्या नियमाप्रमाणे उमेदवाराने त्याच्या दहावीच्या प्रमाणपत्रानुसार अर्जात नाव लिहावे. मराठी पद्धतीनुसार आडनाव, स्वतःचे नाव वडिलांच्या नावापुढे येते. 2019 पर्यंत पूजा खेडकर यांनी यूपीएससी परीक्षेत आपले नाव असेच लिहून दिले असे दिसते. पण 2021 पासून त्यांनी परीक्षेसाठी पूजा मनोरमा दिलीप खेडकर हे नाव देण्यास सुरुवात केली. त्यानंतर संपूर्ण नाव बदलून 2021-22 मध्ये परीक्षा दिल्याचे समोर आले आहे. यानंतर पूजा यांनी दिलीपराव या वडिलांच्या नावाऐवजी दिलीप हे नाव वापरले. तसेच दिलीप या नावाचे स्पेलिंगदेखील बदलल्याचे समोर आले आहे.
अशाप्रकारे नावात बदल करून यूपीएससी परीक्षेचे निर्धारित प्रयत्न पूर्ण केल्यानंतरही जादाच्या दोन वेळा परीक्षा दिली. नावबदलासंदर्भातील प्रतिज्ञापत्र पूजा खेडकर यांनी यूपीएससीला सादर केले की नाही, याबाबत आता शंका उपस्थित केली जात आहे. राज्य सरकारने नावात आईचे नाव लावण्याचा निर्णय 2024 मध्ये घेतला आहे. तर मग पूजा खेडकर यांनी 2021 पासूनच आपल्या नावात आईच्या नावाचा समावेश केला होता. त्याआधी त्या आईचे नाव का वापरत नव्हत्या असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
युपीएससी परीक्षेच्या नियमानुसार, खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना 6 वेळा युपीएससी परिक्षा देण्याची संधी असते. तर ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थी 9 वेळा ही परिक्षा देऊ शकतात. परंतु, या दोन्ही मर्यादा ओलांडून पूजा खेडकर यांनी तब्बल 11 वेळा परिक्षा दिल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांनी नाव बदलून ही परिक्षा दिली आहे.