पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवार गटातील नेते छगन भुजबळ हे काल सोमवारी (दि.15) शरद पवार यांची भेट घेतले होते. यावेळी त्यांच्यात तास-दीड तास चर्चा सुरु असल्याचे बोललं जात आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. त्यानंतर आज मंगळवारी (दि.16) शरद पवार यांच्या मोदीबागेत खासदार सुनेत्रा पवार पोहचल्या आहेत.
लोकसभा निवडणुकीनंतर प्रथमच सुनेत्रा पवार शरद पवार यांच्या पुण्यातील निवासस्थानी गेल्या आहेत. त्यावेळी शरद पवार मोदीबागेतच होते. सुमारे तासभरापेक्षा जास्त वेळ खासदार सुनेत्रा पवार मोदी बागेत होत्या. परंतु त्यांनी कोणाची भेट घेतली? शरद पवार यांच्यासोबत त्यांची चर्चा झाली का? ही माहिती मिळाली नाही.
खासदार सुनेत्रा पवार मोदीबागेत दाखल झाल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे. जवळपास तासभर तिथे थांबल्यानंतर सुनेत्रा पवार तेथून रवाना झाल्या. यावेळी त्यांनी शरद पवार, सुप्रिया सुळे यांची भेट घेतली की नाही? याबद्दल राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.