नागपूर : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीने मोठा विजय मिळविला. आता आगामी विधानसभेसाठी महाविकास आघाडीनं जोरदार कंबर कसली आहे. आतापर्यंत विधानसभेच्या जागावाटपावरुन आमच्यात कोणताही मतभेद नाहीत, असा दावा महाविकास आघाडीने केला होता खरा, मात्र जागावाटपावरुन खटके उडण्याची शक्यता दिसत आहे. कारण कि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं नागपूरसह विदर्भात आगामी विधानसभेसाठी वाढीव जागांची मागणी केल्याची माहिती समोर आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं नागपूरसह विदर्भात विधानसभा निवडणुकीसाठी वाढीव जागांची मागणी केली आहे. नागपूर जिल्ह्यात आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस फक्त काटोल आणि हिंगणा या दोन जागांवर निवडणूक लढवत होती. आता मात्र पवारांच्या पक्षानं काटोल, हिंगणा, उमरेड या ग्रामीण भागातील तीन जागांसह नागपूर शहरातील किमान दोन जागा मिळाव्यात अशी मागणी केली असल्याचे समोर आले आहे.
विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यात पक्षाला वाढीव जागांची अपेक्षा आहे. त्यामुळे विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यात किमान एक जागा तरी राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षाला देण्यात यावी, अशी मागणीही पक्षानं केली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीमधील जागा वाटपाचा तिढा वाढण्याची शक्यता दिसत आहे.
आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसची डोकेदुखी वाढणार असल्याची चिन्ह दिसत आहेत. विशेष म्हणजे, विदर्भातील 62 जागांपैकी 2019 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं 12 जागा लढवल्या होत्या. यंदा मात्र पक्षानं प्रत्येक जिल्ह्यात जागांची मागणी केली आहे. त्यामुळे काँग्रेसच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.