– विजय लोखंडे
वाघोली (पुणे) : शिरुर-हवेलीचे आमदार अॅड.अशोक पवार यांच्या प्रयत्नातून केसनंद फाटा वाघोली बसस्थानक ते आय.व्ही.इस्टेट सोसायटी गृह प्रकल्प परिसर अशी बससेवा सुरू झाली आहे. या मार्गावरील बससेवेचा शुभारंभ हिरवे ध्वज दाखवून आमदार अशोक पवार, वाघोलीच्या सरपंच वसुंधरा उबाळे, वाघोली बस डेपोचे व्यवस्थापक सोमनाथ वाघोले तसेच आय.व्ही.इस्टेट सोसायटीचे पदाधिकारी यांच्या हस्ते पार पडला.
यावेळी आमदार अशोक पवार यांचा सत्कार सोसायटीतील नागरिकांच्या वतीने करण्यात आला. त्यानंतर आमदार पवार यांनी स्वतः प्रवासाचे तिकीट काढून आय.व्ही.इस्टेट ते केसनंद फाटा वाघोली बसस्थानक असा बसमध्ये प्रवास केला. अशी माहिती माजी सरपंच तथा राष्ट्रवादी ओबीसी सेलचे पुणे जिल्हाध्यक्ष शिवदास उबाळे यांनी दिली.
वाघोली परिसरात अनेक मोठ मोठ्या लोकवस्ती असलेल्या गृहप्रकल्प सोसायट्या वाढत आहेत. त्याच प्रमाणात त्यांच्या सेवा, सुविधांचा प्रश्नही मोठ्या प्रमाणात निर्माण होत आहे. यामध्ये वाघोलीतील आय.व्ही.इस्टेट ही गृह प्रकल्प सोसायटी अधिक लोकसंख्या असलेली सोसायटी प्रचलित आहे. या आय.व्ही.इस्टेट गृहप्रकल्प शेजारी लागूनच अनेक इतरत्र गृह प्रकल्प सोसायट्या आहेत. त्यामुळे येथील नागरिकांना व पुणे शहरात शिक्षणा साठी जाणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांना वाघोली बसस्थानक पर्यंत प्रवास करण्यासाठी कोणतेही सोयी सुविधा नसल्याची माहिती आमदार अशोक पवार यांच्या पर्यंत पोहोचली. तर येथे बससेवा सुरू करण्याची मागणी सोसायटी धारकांनी केली होती. याची दखल घेत आमदार अशोक पवार यांनी केसनंद फाटा वाघोली बसस्थानक ते आय.व्ही.इस्टेट अशी बससेवा सुरू करण्याच्या सूचना पी.एम.पी.एल.खात्याला केल्यानंतर या मार्गावर आता बससेवा सुरू झाली आहे. या मार्गावर दर 40 मिनिटांनी बसची सुविधा उपलब्ध केली आहे.
वाघोली परिसराचा सर्वांगीण विकास आजवर आमदार अशोकबापू पवार यांच्या माध्यमातून झाला. आजही बापू वाघोलीचे विविध प्रश्न, समस्या, अडी अडचणी सोडविण्याचे काम करत आहेत. त्यांनी प्रयत्न करून वाघोली बसस्थानक ते आय.व्ही.इस्टेट अशी बससेवा सुरू केली. याबाबत आमदार अशोक बापुंकडे या सोसायटीतील नागरिकांनी बस सुरू करण्याची मागणी केली होती. त्यावेळी बापूंनी त्यांना शब्द दिला होता. पुढच्या काही दिवसातच आपण बससेवा सुरू करू. तो शब्द पूर्णत्वास नेत बापूंनी पुन्हा एकदा आपल्या सर्वोत्तम कामाची “दिलेला शब्द पाळून कार्यकुशलता दाखवून दिली” असल्याचे प्रतिक्रिया देताना वाघोलीचे माजी सरपंच तथा राष्ट्रवादी ओबीसी सेलचे पुणे जिल्हाध्यक्ष शिवदास उबाळे यांनी सांगितले.