यवत (पुणे) : पारगाव येथे भांडणे सोडवण्यासाठी गेलेल्या व्यक्तीला मारहाण केल्याची घटना घडली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, पारगावच्या हद्दीतील तळवाडी येथे चुलत भावाच्या पत्नीबरोबर एक व्यक्ती दररोज बोलत असे. त्या कारणाने चुलत भाऊ आणि सदर व्यक्तीसह साथीदार यांच्यासोबत वाद सुरु होते.
दरम्यान, किशोर सोनवणे हे वाद मिटवण्यासाठी गेले असता गौरव ताकवणे, अनिकेत ताकवणे, रमेश झांझुर्णे व आदेश ताकवणे ( चौघेही रा. पारगाव ,ता. दौंड, जि.पुणे ) यांनी दमदाटी व जातीवाचक शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केले असल्याची फिर्याद किशोर सोनवणे यांनी यवत पोलीस स्टेशन येथे दिली.
यावरून गौरव ताकवणे, अनिकेत ताकवणे, रमेश झांझुर्णे व आदेश ताकवणे या चौघांच्या विरोधात यवत पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पुढील तपास दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी आण्णासाहेब घोलप हे करीत आहेत.