पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) येत्या २१ जुलै रोजी घेण्यात येणारी महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा २०२४ पुढे ढकलण्यात आली असून, आता ही परीक्षा २५ ऑगस्ट रोजी घेण्यात येईल. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना अपेक्षित आरक्षणाचा लाभ घेता येणार आहे.
आयोगाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा २०२४ परीक्षेकरिता मूळ जाहिरातीस अनुसरून अर्जाद्वारे अराखीव (खुला) अथवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातून अर्ज केलेल्या उमेदवारांना सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाचा अथवा इतर मागासवर्गाचा दावा करण्याकरता विकल्प सादर करण्यासंदर्भात कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अर्ज प्रणालीमधील प्रोफाइलमधील सदराखाली परीक्षेच्या जाहिरातीकरता उपलब्ध करून देण्यात आलेल्या सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाचा अथवा इतर मागासवर्गाचा दावा करण्याकरता विकल्प सादर केल्यास संबंधित उमेदवाराचा मूळ अर्जातील दावा रद्द समजण्यात येईल, असे आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.