मुंबई : विधानपरिषद निवडणूकीत शेकापचे नेते जंयत पाटील यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. २३ मतांचा अपेक्षित कोटा पूर्ण न करता आल्याने त्यांचा पराभव झाला. या निवडणुकीमध्ये महायुतीचे ९ महाविकास आघाडीचे २ उमेदवार निवडून आले आहेत. तर मविआचे तिसरे उमेदवार शेकापचे नेते जयंत पाटील यांना पराभव स्वीकारावा लागला आहे.
विधानपरिषद निवडणुकीत झालेल्या पराभवावर जयंत पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचं एक मतं फुटलं, तर काँग्रेसकडून मदत मिळाली नाही, असं वक्तव्य केलं आहे. तसेच आगामी काळात देखील महाविकास आघाडीसोबतच राहणार असल्याचं जयंत पाटील यावेळी म्हणाले.
जयंत पाटील आज शरद पवार यांच्या भेटीसाठी सिल्वर ओकवर आले होते. मात्र, ते आजारी असल्याने जास्त भेटले नाहीत, असं त्यांनी सांगितले. विधानपरिषद निवडणुकीत घोडाबाजार झाला असून निकालचे आम्ही आत्मचिंतन करणार आहोत. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये असे राजकारण कधीच झाले नव्हते. राष्ट्रवादीच्या १२ मतांवर उभा होतो, यातील एक मत फुटलं. माझं १४ मतांचं गणित होते. दुसऱ्या क्रमांकाच्या मतांवर निवडून येण्याचं गणित होतं. मात्र, राष्ट्रवादीचं एक फुटलं, काँग्रेसकडून दुसऱ्या पसंतीक्रमाची मतं मिळाली नाहीत, असं म्हणत जयंत पाटील यांनी नाराजी दर्शविली.
पुढे बोलताना म्हणाले, नाना पटोले यांच्या सोबत माझं बोलणं झालं नाही. महाविकास आघाडीचा आणि शेकापचा उमेदवार होतो. आमची भूमिका ठाम आहे आम्ही महाविकास आघाडी म्हणून पुढे जाणार आहोत. महाविकास आघाडीतील मोठे पक्ष छोट्या पक्षांना संपवायला बसलेले नाहीत, असं देखील जयंत पाटील म्हणाले.
शरद पवार यांनी सांगितलेलं खरं ठरलं : जयंत पाटील
शरद पवार यांना मी धन्यवाद देतो, ते माझ्यासाठी उभे राहिले, माझ्यासाठी वेळ खर्ची घातला. दिवसातून दोन तीन वेळा संपर्क करत होते. अनेक बैठका झाल्या. शरद पवारांनी हे फसवतील, ते फसवतील हे सांगितलेलं, ते खरं ठरलं. शरद पवार यांनी माझ्यासाठी रात्री पर्यंत जागून बैठका घेतल्या, असं जयंत पाटील यावेळी म्हणाले.