लोणी काळभोर : दाजी व बहिणीकडे फिरण्यासाठी आलेल्या एका अल्पवयीन मुलीने घराच्या अँगलला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना लोणी काळभोर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील ढिले वस्ती परिसरात शुक्रवारी (ता.१२) दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे.
रुपाली बुधिया मुंडा (वय-१७, मूळ रा. ओडीसा) असे आत्महत्या केलेल्या अल्पवयीन मुलीचे नाव आहे. याप्रकरणी रुपालीचा दाजी सिरो रघु महतो (वय-२२, रा. सिद्राम मळा, लोणी काळभोर, ता. हवेली) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात खबर दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खबर देणारा सिरो महतो हा लोणी काळभोर परिसरात लागेल ते काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता. तर सिरो महतो व आत्महत्या केलेली अल्पवयीन मुलगी रुपाली हे दोघे एकमेकांचे नात्याने दाजी मेव्हुणी आहेत. रुपाली ही दाजी सिरो महतो व बहिणीकडे फिरायला आली होती. दरम्यान, रुपाली मुंडा हि शुक्रवारी (ता.१२) दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास राहत्या घरातील अँगलला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन लटकलेल्या अवस्थेत आढळून आली होती. याप्रकरणी सिरो महतो यांनी लोणी काळभोर पोलिसांना माहिती दिली होती.
या घटनेची माहिती मिळताच, लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार केतन धेंडे व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने रुपाली मुंडा यांचा मृतदेह खाली उतरविला. व शवविच्छेदन करण्यासाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण समजेल.
दरम्यान, याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मात्र रुपाली मुंडा यांनी आत्महत्या का केली? याचे कारण अद्याप समोर आले नसले, तरी पुढील तपास लोणी काळभोर पोलीस करीत आहेत.