नळेगाव (लातूर) : येथे पत्नीने पतीच्या डोक्यात पोळपाट घालून त्याला जबर मारहाण केली. तसेच दोरीने गळा आवळून त्याचा खून केल्याची घटना मंगळवारी (दि.९) मध्यरात्रीच्या सुमारास घडली. पोलिसांनी पत्नीवर खुनाचा गुन्हा दाखल करत तिला अटकही केली आहे. राजेंद्र किसन कांबळे (४०, रा. नळेगाव, ता. चाकूर) असे मृताचे नाव आहे. या खुनाचे नेमके कारण स्पष्ट होऊ शकले नाही.
मृत राजेंद्र कांबळे हा सालगडी म्हणून शेतात काम करत होता. १५ वर्षांपूर्वी त्याचा विवाह झाला होता. त्यांना दोन मुले आहेत. मंगळवारी (दि.९) मध्यरात्री नवरा-बायकोच्या वादातून पत्नी संगीताने (वय ३५) पतीच्या डोक्यात पोळपाट घालून जबर मारहाण करून, सुताच्या दोरीने गळा आवळून त्याला ठार केले. बुधवारी (दि.१०) सकाळी मृताचा भाऊ संजू किसन कांबळे यांच्या फिर्यादीवरून चाकूर पोलीस ठाण्यात पत्नी संगीता राजेंद्र कांबळे विरोधात फिर्याद दिली.
त्यानुसार याप्रकरणी चाकूर पोलिसांत भारतीय न्यायसंहिता नुसार कलम १०३ (३) अन्वये गुरनं. ३३६/२४ गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपअधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी, पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजेश घाडगे, पोलीस अंमलदार डी. टी. सिरसाट, राजकुमार वाघमारे करीत आहेत.