यवत : दौंड तालुकातील बोरीऐंदी गावामध्ये काकड आरती महोत्सव सांगता कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. एक महिन्यापासून पहाटे काकड आरती महोत्सव सुरू होता. या कार्यक्रमाला गावातील तरुणांनी, ग्रामस्थांनी मनापासून सहभाग घेतला.
दररोज गावातील एक दांपत्य मंदिरात येऊन मंदिर स्वच्छता, हार, धूपदीप, रांगोळीचे नियोजन करत होते. जुन्या काळापासून चालत आलेली परंपरा तरुणपिढी चालवत आहे. अशा कार्यक्रमांमुळे गावात एकता, समता, गावातील बांधीलकी जपली जाते. नागरिकांमध्ये देवाप्रती भाव जागृत होतो, असे मत हरिभक्त परायण किसन महाराज गायकवाड यांनी व्यक्त केले.
सकाळी काकड आरती नंतर आठ वाजता गावातून भजनी मंडळींनी ग्रंथदिंडी काढली. संध्याकाळी सुरेश महाराज साठे यांचे कीर्तन झाले. कार्यक्रमानंतर पूर्ण गावाला लोकवर्गणीतून महाप्रसाद ठेवण्यात आला होता. सर्व गावकऱ्यांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. याप्रसंगी सरपंच जीवन पवार, उपसरपंच शुभांगी गायकवाड, ग्रामसेवक प्रकाश जाधव, तंटामुक्ती अध्यक्ष सचिन गायकवाड, प्रताप तावरे, अशोक गायकवाड, दादा शेलार, राजेंद्र कदम, सचिन दौंडकर आदी पदाधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते.