युनूस तांबोळी
कवठे येमाई : कॅालेज जीवन नुकतेच संपून गावाकडे काही तरी व्यवसाय करण्याचे काम करत होतो. त्या काळात मनोरंजनाचे साधन म्हणजे पडद्यावरील चलचित्र (चित्रपट ) नाही तर यात्रा जत्रांमधून होणारा लोकनाट्याचा तमाशाचा कार्यक्रम. मनोरंजनासाठी शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथे गावात कोजागिरी पोर्णिमेला हौशी कलाकांराचे नाटक असायचे. या नाटकांमधून भुमिका केल्या असल्याने कलावंताच्या संगतीत अनेक दिवस गेले.
त्या काळात शाहिर, कवी, लेखक बी. के. मोमीन कवठेकर आणि तमाशा फड मालक ढोलकीपटू गंगारामबुवा कवठेकर यांनी राज्यात नावलौकीक मिळवलेला होता. आकाशवाणी पुणे केंद्रावर “सोयऱ्याला धडा शिकवा” या वगनाट्याचे लिखाण करून त्यामध्ये भुमिका करण्याची संधी त्यांनी मला मिळवून दिली. समाज प्रबोधन, मनोरंजनातून जागृती करणाऱ्या अशा लोककलावंतासोबत काहि काळ घालवल्यानंतर जीवनातील या आठवणी त्यांच्या कार्याची आठवण करून दिल्याशिवाय रहात नाही.
कवठे येमाई गावात हौशी कलावंताचे मंडळच असायचे. नाटक अन त्याचा होणारा सराव हा तसा गंमतीदार असायचा. नाटकांतील भूमिकेला योग्य स्थान मिळवून देण्याचे काम त्यावेळी केले होते. घुंगरू, नवा संसार, कवडी चुंबक, एखाद्याचे नशिब, बिजली कडाडली अशा अनेक नाटकांमधून मुख्य भुमिका केल्या. नाटकांच्या सरावा दरम्यान या दोन्ही कलाकारांचे मार्गदर्शन मिळायचे. अभिनय, वेशभूषा, केशभूषा, प्रसंगावधान आणि हजरजबाबीपणा यासाठी त्यांचे मार्गदर्शन महत्वाचे होते. आवडता कलाकार म्हणून त्यांची माझ्याकडे पहाण्याची दृष्टी काही वेगळीच आपुलकीची असायची. वेळप्रसंगी त्यांची बोलणी आणी रागवणे आपलेपणाचे होते.
अचानक एके दिवशी या दोन दिग्गज कलाकालांनी मला बोलावून घेतले. आकाशवाणी केंद्रावर आपल्याला लोकनाट्य कार्यक्रम साजरा करावयाचा आहे. काय विषय असेल नाटक रूपात लिहून दे. असे सांगितल्यावर हुंडाबळीवर आधारित विषय त्यांना नाटक रूपात लिहून दिले. त्यावर बी. के. मोमीन यांनी त्यांच्या लेखणीचा हात फिरवला. त्यातून “सोसऱ्याला धडा शिकवा” या वगनाट्यात त्याचे रूपातंर झाले. कलाकारांची तयारी झाली. आणि रेकॅाडिंग करण्याची वेळ तारिख ठरल्याचे त्यांनी सांगितले.
भल्या सकाळीच सर्व कलाकार घेऊन गाडी पुण्याकडे धावू लागली. रस्त्याच्या कडेला गाडी थांबवून एका झाडाखाली सगळ्यांना बसवले गेले. त्यातून गंगारामबुवा कवठेकर यांनी आणलेले भाकरीचे गाठेडे सोडण्यात आले. आम्ही सर्व मित्रांनी भाजीभाकरी खाऊन समाधान व्यक्त केले. त्यावेळी कवठेकर म्हणाले की, मुलांनो मी लोकनाट्याची कला राज्यात आणि राज्याबाहेर कार्यक्रम करून गाजवली. अनेक चांगल्या वाईट प्रसंगांना सामोरे गेलो. बुवांची ढोलकी आणी भाईंची गाणी राज्यभर गाजली. त्यातून नावलौकिक मिळवित वेगवेगळे पारितोषिके देखील मिळवले. पण कलेचा गर्व कधी केला नाही.
आता ही कला काळाच्या पडद्याआड जाऊ लागली आहे. मनोरंजनाची नवीन साधने यामुळे या कलेकडे पहाण्याचा दृष्टिकोन बदलत चालला आहे. नवतरूणांनी ही कला जोपासत तमाशा कलावंताना उभारी दिली पाहिजे. कवठे येमाई ही कलाकारांची नगरी असूनआपल्या गावचे नाव सांस्कृतीक कार्यक्रमात गाजले पाहिजे. तेथील वन भोजन आटोपून आम्ही थेट पुणे आकाशवणी केंद्रात दाखल झालो.
सकाळची वेळ होती. साजसामान घेऊन सर्वजण रेकॅार्डरूम मध्ये दाखल झालो. घरून निघालो तेव्हा देखील थंडीच होती. अन रेकॉर्डिंगरूम मध्ये एसी असल्याने तेथेही थंडीच वाजत होती. लोकनाट्य म्हटल की हलगी ढोलकीची जुगलबंदी सुरवातीला ठरलेलीच. रेकॅार्ड सुरू असताना जसा लोकनाट्याचा ठसका पाहिजे तसा काही ठसका त्यातून येत नव्हता. तेथील अधिकाऱ्यांची नाराजी या दिग्गज कलाकारांच्या लक्षात आली. हे दोन्ही कवठेकरांनी तातडीने दोन कलावंत व हलगी ढोलकी घेऊन बाहेर गेले. तेथील कचरा काहि कागद गोळा करून हलगी तापवून ढोलकीला ताण दिला.
कलाकाराची बोट तापली तसी हलगीवर गरगरा फिरू लागली. ढोलकीचा कडक आवाज सुरात आला. ‘अहो साहेब थोड्यावेळ एसी बंद करा…’ या कवठेकरांनी तेथील अधिकाऱ्याला विनंती केली. तसा एसी बंद झाला. हार्मोनियमवर सुर मिळाला. त्यावर हलगी ढोलकी कडाडली. गंगारामबुवा कवठेकरांच्या ढोलकीची थाप अन लोकनाट्याचा खरा बाज अधिकाऱ्यांनी अनुभवला. त्यावर गण, गवळण आणि वगनाट्य विनाअडथळा पार पडले. वगनाट्यातील पोलिस इन्सपेक्टर तांबोळी ही भूमिका मी केली होती .
रेकॉर्डिंग खुप चांगले झाले अशा प्रतिक्रिया तेथील अधिकाऱ्यांकडून आल्या. रेकॅार्ड झाल्यावर प्रसिद्धिची तारिख ठरली तशी गावच्या पारावर सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान पुणे आकाशवाणीवर गंगाराम बुवा कवठेकर यांच्य़ा लोकनाट्याचा कार्यक्रम संपुर्ण महाराष्ट्राने ऐकला. त्यावेळी मी लिखाण केलेल्या “सोयऱ्याला धडा शिकवा” या वगनाट्याला आगळेवेगळे स्थान मिळाले होते. लेखक युनूस तांबोळी हे नाव मी पहिल्यांदा आकाशवाणी पुणे केंद्रावर ऐकले होते. हे माझे पहिले लिखाण या दोन दिग्गज कलाकारांमुळे राज्यभर पोहचले.
त्यानंतर मी दैनिक सकाळ बातमीदार म्हणून अनेक प्रकारे लिखाण केली असतील. पण माझ्या लिखाणाला माझ्या कलेला भरभरून दाद देण्याऱ्या या दोन दिग्गज कलाकांरानी दिलेली साथ आज ही मला लोख मोलाची आहे. पुढे या दोन्ही कलाकारांना तमाशा स्रमाज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवन गौरव राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला. यासाठी दैनिक सकाळ मधून या दोन्ही कलाकारांचा जीवन क्रम लिहला. काही दिवसापुर्वी शाहिर, कवी, लेखक बी. के. मोमीन कवठेकर यांनी या जगाचा निरोप घेतला.
त्यांच्या गाण्यांनी आजही लोकांच्या मनावर अधिराज्य केले आहे. गेल्या आठवड्यात लोकनाट्य तमाशा फड मालक, ढोलकीपटू गंगारामबुवा कवठेकर हे काळाच्या पडद्याआड गेले. शिट्ट्या, टाळ्या आणि फेटा उंचावत त्यांच्या ढोलकीला मिळालेली दाद आजदेखील कुणीच विसरू शकत नाही.
महाराष्ट्राने गौरविलेल्या या दोन्ही कलाकारांना भावपुर्ण श्रद्धांजली..