पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील रावेत येथे नेमकं चाललयं काय? रावेत येथील ‘लव बडर्स’ कॅफेवर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सोमवारी(दि. 8) कारवाई केली. यावेळी कॅफेमधील पडदे लावुन पार्टीशन केलेल्या जागेत शिक्षण घेत असलेल्या मुला मुलींना एकांतात बसण्यासाठी व अश्लील चाळे व असभ्य वर्तन करण्यासाठी जागा उपलब्ध करुन दिल्याचे आढळून आले. याप्रकरणी संबंधित चालकावर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्षाच्या पोलीस हवालदार संगीता जाधव (वय-37) यांनी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, कॅफे चालक धिरज प्रकाश मोहिते (वय-22 रा. विरंगुळा सोसायटी, वाकड), कॅफे मालक भाग्यश्री लक्ष्मण ढाकणे (वय-34 रा. काटकरवाडी, अंबाजोगाई, उजणी जि. बीड) यांच्यावर महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुलं आणि मुली अश्लील चाळे व असभ्य वर्तन
पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्षाला माहिती मिळाली की, रावेत येथील डीवाय पाटील रोडवरील पवणी प्राईड मधील शॉप नंबर 6 मध्ये असलेल्या ‘लव बडर्स’ कॅफे मध्ये मुला-मुलींना एकांतात भेटण्यासाठी जागा उपलब्ध करुन दिली जात आहे. याठिकाणी मुलं आणि मुली अश्लील चाळे व असभ्य वर्तन करत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने मिळालेल्या माहितीची तपासणी केली.
पोलिसांनी केलेल्या तपासात ‘लव बडर्स’ कॅफे शॉपचा कोणताही परवाना आरोपींकडे नाही. तसेच सार्वजनिक ठिकाणी ‘लव बडर्स’ कॉफी शॉपचा बोर्ड लावून खाद्य पदार्थ विक्री करत होते. पथकाने शॉपची पाहणी केली असता कॉफी शॉपच्या पहिल्या मजल्यावरील रुमध्ये 3 X 3 लांबी रुंदीचे प्लायवुडचे व पाच फूट उंचीचे पाच कप्पे दिसून आले.
या कप्प्यांना बाहेरच्या बाजूने पडदे लावून आतमध्ये बसण्यासाठी सोफा ठेवले होते. यामध्ये महाविदयालयीन मुला मुलींना बसण्यासाठी व अश्लील चाळे व बेशिस्त वर्तन करण्यासाठी जागा उपलब्ध करुन दिल्याचे उघडकीस आले. त्यानुसार पोलिसांनी कॅफे चालक व मालक यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.