सांगली : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता शरद पवारांनी विधानसभेची जोरदार तयारी सुरू केली आहे. शरद पवार यांनी गाव दौरे सुरु केले आहेत. सांगलीच्या दौऱ्यावर असताना त्यांनी आता महाराष्ट्रातून पहिला उमेदवार जाहीर केला आहे. स्व. आर. आर. पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील यांना आगामी काळात साथ देण्याचं आवाहन शरद पवार यांनी केले आहे.
शरद पवार हे सांगलीच्या दौऱ्यावर होते, त्यावेळी त्यांनी तासगावमध्ये आर आर पाटील यांच्या समाधीस्थळाचं दर्शन घेतलं. त्यावेळी ते बोलत होते, ते म्हणाले आमदार सुमनताई यांच्यानंतर आता रोहित पाटील यांच्या पाठीशी राहा, येणाऱ्या काळात तुम्ही रोहितला ताकद द्या, आम्ही सर्व प्रश्न सोडवू असं वक्तव्य शरद पवार यांनी केलं आहे.
रोहित पाटील यांनी नुकताच त्यांचा 25 वा वाढदिवस साजरा केल्यानंतर ते आता तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार अशी चर्चा रंगली होती. त्यानंतर आता शरद पवारांनी त्यांच्या उमेदवारीचे स्पष्ट संकेत दिल्याचे दिसत आहेत.
पुढे बोलताना पवार म्हणाले की, लोकसभेच्या निवडणुकीवेळी काहीजणाच्या डोक्यात सत्ता गेली होती, डोक्यात गेलेली सत्ता उतरवायची असेल तर लोकांना सोबत घेतलं पाहिजे. आपण लोकसभेमध्ये दहा पैकी आठ जागा जिंकल्या. सर्वसामान्य कुटुंबातील पारनेरचे आमदार निलेश लंके यांना संधी दिली. भाजपकडून ४०० च्या खाली जागा येणार नाही असे सांगण्यात येत होतं. जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी यांच्यावर नरेंद्र मोदींनी सातत्याने टीका केली, मात्र मतदारांनी त्यांना स्वीकारलं नसल्याचं शरद पवार म्हणाले.