पुणे: काही दिवसांपूर्वी पुण्यात वाहतूक पोलिसांनी दुचाकीसोबत माणसाला टोईंग करून गाडीत चढविल्याचा आणि टोईंग करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून मारहाणीचा दाखल केल्याचा अजब प्रकार घडला होता. आता आणखी एक घटना समोर आली आहे, ज्यामुळे वाहतूक पोलिसांचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. वाहतूक पोलिसांची एक कृती समाज माध्यमांवर चांगलीच व्हायरल झाली आहे. वाहतूक पोलिसांनी एका रिक्षाचालकाला चक्क हेल्मेट घातले नाही, म्हणून दंडाच्या रकमेबाबत नोटीस पाठवली आहे.
तसेच, रिक्षा चालकाला ही रक्कम न भरल्यास न्यायालयात खटला भरण्याबाबतही सूचित करण्यात आले आहे. प्रत्यक्षात मात्र दुचाकीवर हेल्मेट न घातल्याबद्दल दंड करण्यात येतो. परंतु, रिक्षावर हेल्मेट घातले नसल्याचा दंड करताना संबंधित कर्मचाऱ्याकडून असा प्रकार कसा घडला, असा प्रश्न आता उपस्थित केला जाऊ लागला आहे.
वाहतूक पोलिसांची नोटीस आल्यानंतर याबाबतची माहिती रिक्षाचालकाने लागलीच पुणे जिल्हा महाराष्ट्र वाहतूक शिवसेना (उद्धव ठाकरे) संघटनेच्या दत्तात्रय घुले यांना माहिती दिली. त्यानंतर वाहतूक पोलिसांचा हा भोंगळ कारभार समोर आला आहे. प्रत्यक्षात ही बाब तांत्रिक चुकीमुळे झाली असण्याची शक्यता आहे. तसेच न्यायालयात खटला जाण्याची शक्यता पाहता नोटीस काढणाऱ्या किंवा मेसेज पाठविणाऱ्या कर्मचाऱ्यांनी याबाबतीत सतर्क राहिले पाहिजे, अशी अपेक्षा सामान्य नागरिक व्यक्त करण्यात येत आहे.
वाहतूक पोलिसांनी पाठवलेल्या नोटिसीबाबत बोलताना रिक्षाचालक योगेश सोनावणे म्हणाले की, मी रिक्षाचालक आहे. माझ्या रिक्षावर हेल्मेट न घालता गाडी चालवत असल्याचा व ५०० रुपये दंड पडल्याचा मेसेज आला. मात्र, प्रत्यक्षात मेसेजमध्ये देण्यात आलेला नंबर हा ऑटो रिक्षाचा होता. रिक्षावर हेल्मेट घातले नाही म्हणून दंड केल्याचा मेसेज पाहून मीच आश्चर्यचकित झालो.