लोणी काळभोर : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (PMRDA) मांजरी खुर्द (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील अनाधिकृत व्यावसायिक बांधकाम हातोडा मारला. पीएमआरडीएच्या वतीने ही कारवाई आज बुधवारी (ता.९) पहाटे ५ ते ८ वाजण्याच्या दरम्यान केली आहे.
मांजरी खुर्द ग्रामपंचायत हद्दीतील सर्वे नं १२५ मधील तब्बल ११,२३२ चौ. फुटांचे व्यावसायिक अनाधिकृत बांधकामे ३ पोकलेनच्या सहाय्याने जमीनदोस्त केले. ही कारवाई पीएमआरडीएच्या अधिकाऱ्यानी उपजिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजनबद्ध व शांततेत करण्यात आली. यावेळी दोन तहसीलदार, पोलीस प्रशासन, १० कनिष्ठ अभियंत्यांसह इतर कर्मचारी उपस्थित होते.
पीएमआरडीए कार्यक्षेत्रात बांधकाम करताना मिळकतधारकांनी परवानगी घेऊनच बांधकाम करावे अन्यथा विनापरवानगी केलेल्या बांधकामावर कारवाई केली जाईल. तसेच यापुढील काळातही अनधिकृत बांधकामे हटविण्याची मोहीम तीव्र राबविली जाणार आहे. अनधिकृत बांधकाम निष्कासनाचा खर्च देखील मिळकतधारकाकडून वसूल केला जाणार आहे, असे पीएमआरडीएने स्पष्ट केले आहे.