– संतोष पवार
पळसदेव (पुणे) : इंदापूर तालुका माजी सैनिक नागरी सहकारी पतसंस्थेने सामाजिक बांधिलकी जपत शैक्षणिक कार्यास हातभार लावला. तसेच विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत केली, हे निश्चितच आदर्शवत उपक्रम असल्याचे मत पळसनाथ शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तथा कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक भूषण काळे यांनी व्यक्त केले.
पळसदेव येथील पळसनाथ विद्यालयात इंदापूर तालुका माजी सैनिक नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी वह्या व इतर शालेय उपयोगी साहित्य वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पळसनाथ विद्यालयातील सुमारे 20 गरजू होतकरू विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले.
माजी सैनिक नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने इंदापूर तालुक्यातील जवळपास नऊ माध्यमिक विद्यालये, आश्रमशाळा यातील 200 हून अधिक विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केल्याची माहिती यावेळी पतसंस्थेचे विद्यमान संस्थापक अध्यक्ष सुखदेव काटे यांनी दिली.
यावेळी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष भूषण काळे, इंदापूर तालुका माजी सैनिक सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष सुखदेव काटे, संचालक व पळसदेवचे प्रतिष्ठीत नागरिक अर्जुन विपट, पळसदेवचे माजी सैनिक हनुमंत काळे, विद्यालयाचे प्राचार्य विकास पाठक, पर्यवेक्षक संजय जाधव, तानाजी इरकल, सिकंदर देशमुख, नितीन जगदाळे, बळवंत निंबाळकर, उज्ज्वला वाघमारे, प्रतिभा कांबळे, शुभांगी कोळी, सुदर्शना पवार, निकिता पवार आदिंसह शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.