- योगेश शेंडगे
शिक्रापूर : शिरूर तालुक्यातून अनेक गावांमध्ये बाजरी बियाणे उगवले नसल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी समोर येत आहेत. तालुक्यातील न्हावरे, इंगळेनगर, दहिवडी, पारोडी, विठ्ठलवाडी, निमगाव म्हाळुंगी अशा अनेक गावांमध्ये शेतकऱ्यांनी पेरणी केलेले बाजरी बियाणे उगवले नाही. त्यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहेत.
“शुद्ध बिजापोटी फळे रसाळ गोमटी”या संत वचनामध्ये बीजप्रक्रियेचे महत्त्व सांगितले आहे. निरोगी पिकासाठी बीज प्रक्रिया हा महत्त्वाचा टप्पा मानला जातो.
यंदा जूनच्या सुरुवातीला चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी लवकरच पेरण्या उरकल्या. शिरूर तालुक्यात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात बाजरीची पेरणी केली. मात्र,काही ठिकाणी बियाणे नित्कृष्ट दर्जाचे निघाल्याने उगवणच झाली नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. पेरणीसाठी शेतकऱ्यांनी एकरी जवळपास 10 ते 15 हजार रुपयांचा खर्च केला आहे. याबाबत शेतकऱ्यांनी बियाणे देणारे डिलर, कृषी सेवा केंद्र दुकानदार, कृषी अधिकारी यांच्याकडे तोंडी तक्रारी केल्या. शेतकऱ्यांनी नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे.
शिरूर तालुक्यात खरिपाचे एकूण 27 हजार 433 हेक्टर क्षेत्र आहे. त्यापैकी बाजरीची 19 हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे. आत्तापर्यंत अनेक शेतकऱ्यांनी बियाणे विक्रेते व डिलर यांच्याकडे तोंडी तक्रारी केल्या आहेत. मात्र, आता शेतकरी पंचायत समितीच्या कृषी अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
तालुक्यातील सात ते आठ गावांतील शेतकऱ्यांनी एका खाजगी कंपनीच्या बाजरी बियाण्याची पेरणी केली असल्याचे समोर आले आहे. त्यासंदर्भात शेतकऱ्यांच्या तक्रारी नंतर कंपनीच्या प्रतिनिधींनी पाहणी करून अहवाल वरिष्ठ कार्यालयाला पाठविला आहे. शेतकऱ्यांनी नुकसानभरपाई देण्याची मागणी त्यांच्याकडे केली आहे. या सर्व प्रकारानंतर तालुका कृषी विभाग काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शेतकऱ्यांच्या संकटात वाढ
कधी कोरडा तर कधी ओला दुष्काळ, कधी गारपीट तर कधी दुबार पेरणी, या संकटामुळे शेतकरी होरपळून निघत आहे. संकटाशी मुकाबला करत शेतकरी वर्षभराचे नियोजन करून पीक लागवड करताना दिसत आहे. शेतकरी आज बोगस बाजरी बियाणांमुळे उद्भवलेल्या पेरणीच्या संकटामुळे त्रस्त आहेत. अगोदरच प्रचंड हालअपेष्टांनी युक्त जीवन जगणाऱ्या बळीराजाला दुबार पेरणी करावी लागत आहे.
शेतकऱ्यांची कारवाईची मागणी
बोगस बियाणे देऊन दुकानदार व कंपनीने शेतकऱ्यांची एकप्रकारे फसवणूकच केली आहे. ज्या कृषी सेवा केंद्रातून व कंपनीकडून हे बियाणे घेऊन शेतकऱ्यांनी पेरले त्या दुकानदार व कंपनीच्या अधिकाऱ्यांविरुद्ध फसवणुकीचे गुन्हे दाखल करावेत व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत.
भारतात बियाणे सदोष निघाले तर काय व्यवस्था आहे
देशातील शेतकऱ्यांना पेरणीसाठी दर्जेदार बियाणे उपलब्ध करून देण्यासाठी भारतीय बियाणे कायदा 1966 करण्यात आला आहे. तो अमलातही आला आहे. या कायद्यानुसार देशातील विविध भागासाठी किंवा स्थानिक दृष्टय़ा महत्त्वाच्या जाती किंवा पिके प्रमाणित वाण म्हणून जाहीर केले आहे. या जातींच्या उत्पादन आणि विक्रीसाठी हा कायदा लागू आहे. बियाणे सदोष निघाल्यास शेतकऱ्यांना या कायद्यान्वये न्याय मागता येतो. मात्र त्यासाठी काही मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे महत्त्वाचे असते.
बियाणे खरेदी करताना घ्यावयाची काळजी
महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागातर्फे बियाणे खरेदी करताना शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी. याच्या सूचना जारी करण्यात येतात. यामध्ये बियाणे खरेदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या काय तपासावे अशा अनेक बाबींचा समावेश असतो. यात, बियाणे खरेदी करताना खरेदीची पक्की पावती घ्यावी. त्यावर बियाणे खरेदी करणाऱ्याचे नाव, पिकाचे व जातीचे नाव, गट क्रमांक, उत्पादकाचे नाव व पत्ता, विक्रेत्याची सही इत्यादी नोंदी असाव्यात. कोणतेही बियाणे घेताना परवानाधारक कृषी केंद्रधारक विक्रेत्यांकडून बियाणे खरेदी करावे. बियाण्याची उगवणक्षमता, शुद्धता, चाचणीची तारीख इत्यादी काळजीपूर्वक वाचावे. प्रमाणित बियाण्याच्या टॅगवर अधिकाऱ्यांची सही असल्याची खात्री करून घ्यावी. या कृषी विभागाच्या सूचना शेतकऱ्यांनी लक्षात घ्याव्यात म्हणजे शेतकऱ्यांची होणारी फसवणूक होणार नाही.
घरच्या घरी बियाणे कसे तपासावे
पेरणीपूर्वी आपल्या बियाणांची उगवणशक्ती तपासणे महत्वाचे असते. घरच्या घरी या बियाणांची साधी आणि सोपी पद्धत असते. एका गोणपाटावर धान्यातून सरसकट 100 दाणे, दिड ते दोन सेंमी अंतरावर 10-10 च्या रांगेत ओळीत ठेवावेत. त्याच्यावर दुसरे गोणपाट टाकून त्याचा गुंडाळा करावा. सहा-सात दिवस पाणी मारल्यानंतर त्यातील किती दाणे जोमदार उगवतात याची टक्केवारी काढावी. त्या प्रमाणात किती बियाणे लागते हे ठरवावे.
ज्या शेतकऱ्यांची बियाणे उगवले नाहीत त्या शेतकऱ्यांनी लेखी तक्रार कृषी विभागाकडे करावी. त्यासोबत बियाणाचे खरेदीचे बिल जोडून द्यावे. जेणेकरून कंपनी, बियाणे, वाण कोणता आहे ते समजेल. त्यानुसार पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
– अमित रानवारे, (कृषि अधिकारी पंचायत समिती, शिरूर)