पिंपरी: तुझ्या पतीला सोडून माझ्याजवळ राहण्यासाठी ये, असा तगादा लावल्याने प्रेयसीने मित्रासोबत मिळून प्रियकरावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. प्रेयसीच्या प्रियकराला तिच्या मित्राने दगडाने ठेचले. यामध्ये प्रियकर गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ही घटना रविवारी 7 जुलै रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास वडाचा मळा, जाधववाडी चिखली येथे घडली.
अब्दुलकमाल शेख असे या हल्ल्यात जखमी झालेल्या प्रियकराचे नाव आहे. याप्रकरणी शेख याचा भाऊ हबीब अब्दुला शेख (वय 36, रा. जाधववाडी, चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानंतर अब्दुलकमाल याची प्रेयसी (वय 34, रा. चिखली) आणि तिचा मित्र प्रेमदास विठ्ठल चव्हाण (वय 28, रा. पाटीलनगर, चिखली) यांच्या विरोधात गुन्हा केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अब्दुलकमाल शेख याचे आरोपी महिलेशी प्रेमसंबंध होते. ‘तू तुझ्या पती व मुलांना सोडून माझ्याजवळ राहण्यास ये’ असा तो तिच्याकडे सतत तगादा लावत होता. या कारणावरून दोघांमध्ये सतत भांडण होत होते. हा विकोपाला गेल्याने प्रेयसीने तिच्या मित्राला हा सर्व प्रकार सांगितला.
त्यानंतर प्रेयसी आणि तिच्या मित्राने अब्दुलकमाल शेख याला लाथाबुक्क्यांनी आणि दगडाने डोक्यात मारून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. फिर्यादी हबीब शेख, रमजान अली आणि हिरामण रोकडे यांनी आरोपी प्रेमदास याला रोखण्याचा प्रयत्न केला. परंतु, ‘तुम्ही मध्ये आला, तर तुम्हाला पण मारून टाकीन’ अशी धमकी देत त्याने शिवीगाळ केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या हल्ल्यात जखमी झालेल्या अब्दुलकमाल याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पोलिसांनी प्रेमदास चव्हाण याला अटक केली आहे. चिखली पोलीस पुढील तपास करीत आहेत.