पुण्यातील टॉयलेट स्वच्छतेच्या टेंडरची चौकशी करा, अन्यथा…; आम आदमी पार्टीचा इशारा
पुणे : पुणे शहरातील टॉयलेटची अत्यंत दुरावस्था वाईट झालेली आहे. हे टॉयलेट स्वच्छ करण्यासाठी महापालिकेने वर्षाला ५० कोटीचे टेंडर दिले असून त्या टेंडरअंतर्ग दिवसातुन ३ वेळा जेट मशिनने स्वच्छतागृह साफ करावे, अशी मागणी आम आदमी पार्टीने केली आहे. यावेळी त्यांनी विविध मागण्या केल्या.
शहरातील स्वच्छतागृहाची अत्यंत वाईट दुरावस्था झाली आहे. पुण्यासारख्या स्मार्ट सिटीमधील स्वच्छतागृहाच्या दुरावस्थेला संबंधीत अधिकारी, ठेकेदार जबाबदार असून यांच्यावर कठोर कारवाई व्हावी, तसेच स्वच्छतेसंदर्भात काढलेल्या टेंडरची प्रत, अधिकाऱ्यांवर असलेली जबाबदारी, नियम अटी व शर्ती संदर्भात सर्व कागदपत्रे आम्हाला मिळावीत, अशीही मागणी त्यांनी केली.
तसेच लेखी पत्र देऊनसुध्दा आपल्याकडुन कुठलेही काम किंवा कुठल्याही अधिका-यांवर अथवा ठेकेदारावर कारवाई झालेली नाही. या कामामध्ये ठेकेदार आणि अधिकारी यांनी मिळून मोठा भ्रष्टाचार केलेला असून या कामाची सखोल चौकशी करण्यात यावी, अन्यथा महानगरपालिका कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला बसू असा इशारा आम आदमी पार्टीने प्रशासनाला दिला आहे.