पुणे: शहर पुन्हा एकदा हिट अँड रन घटनेने हादरले असून, अज्ञात भरधाव वाहनाने रात्री गस्तीवर असणाऱ्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांना उडवल्याची धक्कादायक घडली आहे. खडकी पोलिस स्टेशनमधील कर्मचारी समाधान कोळी आणि संजोग शिंदे हे रविवारी रात्री गस्तीवर असताना दुचाकीवरून जाताना चार चाकी वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेत समाधान कोळी यांचा जागीच मृत्यू झाला. तर संजोग शिंदे हे गंभीर जखमी झाले असून या घटनेमुळे पुणे पोलीस दलावर एकच शोककळा पसरली आहे. तर या प्रकरणातील आरोपीला ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले आहे.
ही घटना घडण्यापूर्वी खडकी पोलिस स्टेशनमधील कर्मचारी समाधान कोळी आणि संजोग शिंदे हे गस्तीवर होते. गस्त घालत असताना त्यांना खडकी भागातील एका बस स्टॉपवर ११ वर्षांची मुलगी आढळून आली. त्या मुलीकडे कोळी आणि शिंदे यांनी विचारपूस केली. तसेच तिच्या आई वडिलांचा नंबर घेतला. तुमची मुलगी एका बसस्टॉपवर आढळून आली असून सांगत घरचा पत्ता विचारल्यावर, ती पिंपळे सौदागर भागात राहण्यास असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर या दोघांनी मुलीच्या आई-वडिलांना बोलावून घेत खातरजमा करून मुलीला तिच्या आई वडीलांच्या स्वाधीन केले. तसेच संबंधित मुलीबाबत पोलीस कॉन्स्टेबल समाधान कोळी आणि संजोग शिंदे यांनी पोलिसांच्या ग्रुपवर माहिती आणि फोटो पोस्ट केला.
त्यानंतर कोळी आणि शिंदे हे खडकी बाजार भागातून बोपोडीच्या दिशेने दुचाकीवरून निघाले होते. त्यावेळी भरधाव आलेल्या चार चाकी वाहनांने त्यांच्या दुचाकीला जोरात धडक दिली. या अपघातामध्ये समाधान कोळी यांचा जागीच मृत्यू झाला , तर संजोग शिंदे हे गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे पुणे पोलिस दलात शोककळा पसरली आहे.