हडपसर : हडपसर ते यवत या सहा पदरी रास्ता केंद्रीय रस्ते विभागाकडून प्रस्तावित आहे. मात्र, हा सहा पदरी रास्ता भैरोबानाला ते यवत असा करण्यात यावा, तसेच रस्त्याचे काम शक्य तितक्या लवकर सुरू करण्यात यावे, अशी मागणी हडपसरचे आमदार चेतन तुपे यांनी नुकत्याच झालेल्या विधिमंडळाच्या अधिवेशनात केली आहे.
पुणे-सोलापूर महामार्ग लगत असलेली गावे आता उपनगरात रूपांतरित होत आहेत. या महामार्गावर दिवसेंदिवस वाहनांची वर्दळ वाढत आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीसह अपघाताचे प्रमाणही वाढत चालले आहे. त्यामुळे या ठिकाणी इलेव्हेटेड सहापदरी रस्ता होणे गरजेचे असल्याचे तुपे यांनी सांगितले.
काय म्हणाले चेतन तुपे?
पुढे बोलताना म्हणाले कि, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली सोलापूर रस्त्यावरील हडपसर ते यवत असा सहापदरी महामार्गाच्या विकास आराखडा तयार करण्याबाबत झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मी देखील उपस्थित होतो. या बैठकीत मी हडपसरऐवजी भैरोबा नाला ते यवत असा महामार्ग करावा, अशी मागणी केली.
त्यामुळे हडपसरच्या नागरिकांना सोलापूर ते पुढे हैद्राबाद वाहतुकीस मार्ग सोपा होईल असा मुद्दा मांडला. हा मुद्दा विचारात घेत तत्काळ आराखड्यात या महामार्गाचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे हडपसर मतदारसंघातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे, असं चेतन तुपे यावेळी म्हणाले.
View this post on Instagram
स्वारगेट-हडपसर ते लोणी काळभोर मेट्रोचा आराखडा तयार
स्वारगेट ते कात्रज, स्वारगेट ते हडपसर व पुढे लोणी काळभोर असा मेट्रो मार्ग प्रस्तावित असून याचा विकास आराखडा तयार झाला आहे. तो मंजुरीसाठी पुढे पाठवण्यात आला आहे. मेट्रो हा नागरिकांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यामुळे मेट्रो मार्ग होणे गरजेचे असून हा मार्ग दुमजली व्हावा ही मागणी मी सातत्याने करत आहे, असंही आमदार तुपे यांनी सांगितले.
पाटबंधारे खात्याचे कॅनॉल बुजवून पर्यायी रस्ते तयार करा : आमदार चेतन तुपे
मेट्रोचे काम सुरू असताना नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी पर्यायी रस्ते तयार होणे देखील तेवढेच महत्त्वाचे आहेत. त्यासाठी पाटबंधारे खात्याचे कॅनॉल बुजवून त्यावर पर्यायी रस्ते तयार करावेत. त्यातून वाहतूक कोंडी सुटेलच आणि पुढील पायाभूत सुविधा उभ्या करण्यासही मदत होईल.