उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील महोबा जिल्ह्यात विजेचा धक्का लागून एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. हा सर्व प्रकार घराबाहेर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. तरूणाचा मृत्यू 22 सेकंदाच्या व्हिडिओमध्ये कैद झाला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून कुटुंबीयांनी टाहो फोडला आहे.
नेमकं काय घडलं?
एक तरुण घरासमोरील व्हरांड्यात काठी घेऊन येतो आणि या काठीचा वरील विजेच्या तारेला स्पर्श होतो. आणि त्या व्यक्तीला जोरदार विजेचा झटका बसून काही सेकंदातचं तो खाली कोसळतो. यानंतर इतर नागरिक धाव घेत त्याचे हात, पाय आणि छाती चोळण्यास सुरुवात करतात.
मात्र त्याधीच त्याचा मृत्यू झालेला असतो. दरम्यान, तरूणाचा मृत्यू 22 सेकंदाच्या व्हिडिओमध्ये कैद झाला असून सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, देवेंद्र (वय-35) असं मृत व्यक्तीचे नाव आहे. तो महोबाच्या चांदोन या गावातील रहिवासी होता. मात्र, यावेळी तो जसोदा नगर येथील चुलत भावाच्या घरी धार्मिक कार्यक्रमासाठी गेला होता. घरातील सर्वजण मंदिरात जाण्याच्या तयारीत असतानाच ही दुःखद घटना घडली आहे.