पंढरपूर : आषाढी वारी काही दिवसांवर आली आहे. लाडक्या विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी वारकरी पंढरीच्या दिशेने मार्गस्थ होत आहेत. भक्त विठू रुक्मिणीच्या भक्तीत तल्लीन होऊन पंढरपुराची वाट धरतात. तर काही वारकरी पंढरीत दाखल झाले आहेत.
मंदिरात लांब रांगा लागत असल्यामुळे भाविकांना लवकर दर्शन घेता यावे असे नियोजन मंदिर समितीने केले आहे. या दरम्यान आता आषाढी यात्रेनिमित्ताने विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी असलेले व्हिआयपी दर्शन आता बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे भाविकांची दर्शन रांग लवकर पुढे सरकणार आहे.
आजपासून मंदिर समितीने व्हिआयपी दर्शन बंद करण्याचा निर्णय घेतल्यामुळे दर्शन रांगेतील भाविकांना मोठा दिलासा मिळाला आहे. शिवाय दर्शन रांग देखील लवकर पुढे सरकण्यास मदत होत आहे. 7 जुलै ते 26 जुलैपर्यंत विठ्ठल मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले राहणार आहे.
आजपासून रविवार (ता.07) विठुरायाचे 24 तास पदस्पर्श दर्शन सुरु झाले आहे. दर्शन सुरु झाल्यानंतर भाविकांची मोठी गर्दी वाढली आहे. यात्रेचा आज पहिलाच दिवस असूनही गोपाळपूर रोडवरील पत्रा शेडपर्यंत दर्शनाची रांग लांबलचक गेली आहे.