पिंपरी- चिंचवड : अजित पवारांचा बालेकिल्ला असलेल्या पिंपरी- चिंचवडमध्ये शरद पवार यांची 20 जुलै रोजी भव्य सभा होणार आहे. यावेळी शक्तिप्रदर्शन देखील केलं जाणार असून 20 हजार कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याची माहिती शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी दिली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवारांचा बालेकिल्ला म्हणून आज ही पिंपरी- चिंचवड शहराचे नाव घेतले जाते. पिंपरी- चिंचवड शहराचा विकास हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला असे नेहमी बोलले जाते. मात्र, मध्यतंरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन गट पडल्यानंतर अजित पवारांची शहरातील ताकद कमी होत असल्याचे दिसून येत आहे. अजित पवारांच्या पाठीशी ठाम उभे असलेले अनेक जण लोकसभेच्या निवडणुकीनंतर शरद पवार गटामध्ये जाण्याच्या तयारीत असल्याचे दिसून येत आहेत. सध्या विधानसभा आणि महानगर पालिका निवडणुका या खुणावत असल्याने शरद पवार गटात चाचपणी होत आहे. अशातच आता शरद पवार गट येत्या 20 जुलै ला मोठं शक्ती प्रदर्शन करण्याच्या तयारीत लागलं आहे.
यावेळी तुषार कामठे म्हणाले, शरद पवार यांच्या भव्य सभेत जुने आणि नवीन अशी मोट बांधण्यासाठी शरद पवार येणार आहेत. तसेच जुने पदाधिकारी आणि कार्यकर्ते शरद पवारांच्या सोबत राहणार आहेत. नवे आणि जुने कार्यकर्ते, पदाधिकारी यांची मोट बांधून पिंपरी- चिंचवड शहरातील तिन्ही विधानसभेसाठी शरद पवार गट नेहमीच आग्रही राहणार आहे.
अजित पवार गटाचे नव्वद टक्के माजी नगरसेवक हे शरद पवार गटाच्या संपर्कात असल्याचे छातीठोकपणे तुषार कामठे यांनी यावेळी सांगितलं. त्यामुळे आगामी काळात अजित पवार गटाची डोकेदुखी आणखी वाढू शकते, असा दावा कामठे यांनी व्यक्त केला आहे.