बारामती : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सपत्नीक सुनेत्रा पवार यांच्यासोबत बारामती येथे आज, रविवारी (ता.07) जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे दर्शन घेतले. यावेळी अजित पवार यांनी बारामती ते काटेवडी वारकऱ्यांसोबत पायी चालत वारीत सहभाग घेतला.
मुंबईहून बारामतीला विमानाने आलेले अजित पवार हे विमानतळावरुन मोतीबाग येथे पालखी सोहळ्यात सहभागी झाले. यावेळी पवार यांनी पुष्पहार अर्पण करून संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे दर्शन घेतले. त्यांनी वारीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांसोबत संवाद साधला आणि टाळाच्या साथीने विठूनामाचा गजर केला.
यावेळी खासदार सुनेत्रा पवार, अपर पोलीस अधीक्षक संजय जाधव, उप विभागीय अधिकारी वैभव नावडकर, उपमुख्यमंत्र्यांचे खासगी सचिव हनुमंत पाटील, महावितरणचे मुख्य अभियंता सुनील पावडे, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उप विभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड, तहसीलदार गणेश शिंदे, गट विकास अधिकारी अनिल बागल आदी उपस्थित होते.
राज्यभरातून आलेल्या वारक-यांनी अजित पवार यांच्यासोबत फोटोसेशनही केले. यावेळी अजित पवार यांनी टोपी परिधान करुन काही वेळ टाळ वाजवून वारक-यांसोबत पायी वारी केली.