इंदापूर : इंदापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लाखेवाडी ग्रामपंचायत हद्दीत एका घरावर दरोडा टाकून फरारी असलेल्या २ आरोपींना स्थानिक गुन्हे अन्वेषण (ग्रामीण) पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
रिजवान उर्फ रियाज सुलेमान जहागीरदार (वय -२२ रा. कंदर ता. करमाळा जिल्हा सोलापूर), प्रवीण उर्फ डागर छगन भोसले (वय-२०, रा. नेवासा फाटा ता. नेवासा, जि. अहमदनगर) असे ताब्यात घेतलेल्या आरोपींचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंदापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या लाखेवाडी (इंदापूर) ग्रामपंचायत हद्दीत २७ ऑक्टोबरला रात्रीच्या सुमारास अशोक कुबडे यांच्या घरावर सशस्त्र दरोडा टाकून रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा एकूण ३ लाख ३३ हजार हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता. सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने माननीय पोलीस अधीक्षक यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मार्गदर्शन करून कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
सदर गुन्ह्याचा तपास करत असताना गोपनीय बातमीदाराच्या बातमीच्या आशयाने सदर गून्ह्यातील आरोपी ताब्यात घेऊन त्यांच्याकडे सदर गुन्ह्याबाबत चौकशी करून तपास केला असता त्यांनी सदरचा गुन्हा केला असल्याची कबुली दिली आहे. पुढील कार्यवाहीसाठी वरील दोघांना इंदापूर पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे.
सदरची कारवाई पोलीस निरीक्षक अशोक शेळके, प्रदीप सूर्यवंशी, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन काळे, धनवे, पोलीस उपनिरीक्षक गणेश जगदाळे, अमित सिदपाटील, सहायक पोलिस उपनिरीक्षक बाळासाहेब कारंडे, रविराज कोकरे, पोलीस हवालदार दीपक साबळे, सचिन घाडगे, आसिफ शेख, जनार्दन शेळके, ज्ञानदेव शिरसागर, रामदास बाबर, राजू मोमीन,अभिजीत एकशिंगे, स्वप्निल अहिवळे, योगेश नागरगोजे, धीरज जाधव, प्राण येवले, मुकुंद कदम दगडू विरकर यांनी केली आहे.